कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या अनेक आठवड्यांच्या अटकळींनंतर, २६ जुलैनंतर पायउतार होण्याचे संकेत मुख्यमंत्री बी. एस.  येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिले.

‘पुढील घडामोडीबाबत मला २५ जुलैनंतरच कळेल आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मी पालन करीन. पक्ष बळकट करण्यासाठी आपण कर्नाटकात पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मी काम करीन,’ असे मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत आतापर्यंत ठाम राहिलेले येडियुरप्पा यांनी बेंगळूरुत पत्रकारांना सांगितले.

यापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री २६ जुलैला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी, २५ जुलैला आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करणार होते, मात्र आता या कार्यक्रमांत बदल करण्यात आला आहे.

येडियुरप्पा यांचे सरकार २६ जुलैला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्या दिवशी ते राजीनामा देऊ शकतात अशा अटकळी होत्या. असे झाल्यास भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होईल.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आमचे राष्ट्रीय अधयक्ष जे. पी. नड्डा यांचे माझ्यावर विशेष प्रेम आणि विश्वास आहे. आमच्या पक्षात ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांना कोणतेही पद दिले जात नाही, हे तुम्हाला माहीत आहे. मात्र माझ्या कामाची कदर करून, मी ७८ वर्षांचा असतानाही त्यांनी मला संधी दिली,’ असे येडियुरप्पा म्हणाले.

लिंगायत समाजातील दिग्गज असलेल्या येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नड्डा यांची भेट घेतली होती.

कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या समर्थनार्थ लिंगायत समाजाने शक्तिप्रदर्शन केले असून, त्यात या समाजाचे साधू व त्यांच्या समुदायाचे काँग्रेस आमदार यांचाही समावेश आहे. तथापि, भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ व अरविंद बेल्लड यांच्यासारख्या भाजप आमदारांसह लिंगायत समाजाच्या नेत्यांकडूनही येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यास विरोध होत आहे.

मंगळवार व बुधवारी निरनिराळ्या मठांच्या साधूंनी येडियुरप्पा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन त्यांना त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याचे आवाहन केले.

येडियुरप्पा यांना हटवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही हालचालीविरुद्ध त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागल्यानंतर, येडियुरप्पा यांनी बुधवारी पक्षाबाबत आपली निष्ठा पुन्हा व्यक्त करण्यासाठी बुधवारी ट्विटरवर एक निवेदन जारी केले. पक्षाला अडचणीचा ठरेल असा कुठलाही विरोध किंवा बेशिस्त कुणीही दर्शवू नये असे आवाहन मी करतो, असे त्यांनी यात सांगितले.