विब्ग्योर शाळेच्या आवारात मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात वादळ उठले असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना छापण्यासाठी तुमच्याकडे सध्या एकच बातमी आहे का, असा सवाल करत या प्रकरणात हात झटकले.
कर्नाटक विधानसभेत महिलांवरील अत्याचारासंदर्भात वादळी चर्चा सुरू असताना सिद्धरामय्या हे झोप काढत असल्याचे एका दूरचित्रवाहिनीवरून दाखवण्यात येत होते. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यावरून काँग्रेस सरकार चोहोबाजूंनी टीका होत आहे.
२२ वर्षांच्या  एका तरुणीवर कारमध्ये आणि १६ वर्षीय ननवर चर्चमध्ये प्रशिक्षणादरम्यान बलात्कार झाल्याच्या घटनेवरून भाजपने आंदोलन केले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत आणि सरकार त्यासाठी काहीही करायला तयार नाही. मुख्यमंत्री तर सभागृहात झोपा काढत होते. त्यामुळे त्यांना जनतेच्या सुरक्षेचे काही पडलेले नाही, अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्यांनी मोर्चाच्या वेळी केली.
 यावर सिद्धरामय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता राज्यात ‘गुंडा अ‍ॅक्ट’ लागू करण्यात आला आहे आणि जिथे त्याची गरज भासेल तिथे तो लागू केला जाईल, असे ते म्हणाले.
मुस्तफाला काढून टाकले होते
बंगळुरूमधील एका प्रख्यात शाळेच्या आवारात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या मुख्य आरोपी मुस्तफा याला याआधीही काही मुलींशी गैरवर्तन केल्याबद्दल कामावरून काढून टाकण्यात आले होते. शाळेच्या व्यवस्थापनाने मंगळवारी ही माहिती दिली, मात्र यावर गेल्या पाच दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या निदर्शकांचे समाधान झाले नाही. त्यांनी शाळेविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. या घटनेनंतर गेले आठ दिवस ही शाळा बंद ठेवण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने व्यवस्थापनाकडे विचारणा केली आहे.
खेळांचे प्रशिक्षण देताना मुस्तफा हा मुलींना आक्षेपार्ह स्पर्श करत होता. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी शाळा व्यवस्थापनाकडे आल्या होत्या. यावर शाळेने मुस्तफाला अनेकदा ताकीद दिली होती. याबद्दल त्याच्याशी चर्चाही केली होती. मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही फरक न पडल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते, असे ‘डीन्स अकादमी’च्या प्राचार्या शांती मेनन यांनी शाळेच्या फेसबुक पेजवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलिसात तक्रार द्यावी, असा कोणताही गुन्हा मुस्तफाच्या हातून घडला नव्हता, असेही मेनन म्हणाल्या. २०११ मध्ये मुस्तफा विब्ग्योर शाळेत कामाला नोकरीला लागला होता. गेल्या रविवारी त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या वेळी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये मुलांशी संबंधित अश्लील व्हिडीओ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.