प्रकृतीचे कारण देत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी शनिवारी टिपू जयंतीचा कार्यक्रम टाळला. खराब प्रकृतीमुळे मुख्यमंत्र्यांना टिपू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होता आलेले नाही. त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्नाटक सरकारकडून संपूर्ण राज्यभरात हजरत टिपू जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. टिपू सुलतान यांची प्रशासनातील दूरदृष्टी आणि सतत नाविन्याचा शोध घेण्याचा ध्यास खरोखरच कौतुकास्पद होता असे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले.

डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन आपण विश्रांती घेत आहोत. त्याचा वेगळ अर्थ काढणे अयोग्य ठरेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सत्ता गमावण्याच्या भितीपोटी टिपू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीय या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. या अंधश्रद्धांना आपला विरोध आहे असे कुमारस्वामी यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांनी टिपू जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. टिपू जयंती साजरी करण्यावरुन काँग्रेसबरोबर मतभेद असल्यानेच मुख्यमंत्री कुमारस्वामी सहभागी झालेले नाहीत असा दावा भाजपाने केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री अनुपस्थित असताना टिपू जयंती साजरी करण्याच्या काँग्रेसच्या हेतूबद्दल भाजपाचे प्रश्न उपस्थित केला आहे. टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आम्हाला कोणालाच स्वारस्य नाही. जनतेपैकीही कोणाचा असा आग्रह नाही. मात्र कर्नाटक सरकारला मुस्लिमांच्या लांगुलचालनासाठी टिपू सुलतान जयंती साजरी करायची आहे असा आरोप कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांनी केला होता. फक्त मुस्लिम मतं मिळवण्यासाठी राज्यात टिपू सुलतान जयंतीचा घाट घालण्यात आला आहे. खरंतर ही जयंती साजरी केलीच जाऊ नये कर्नाटक सरकारने त्यावर बंदी आणली पाहिजे मात्र तसे केले तर त्यांना मुस्लिम समाजाची मतं कशी मिळतील? असाही प्रश्न येडियुरप्पा यांनी विचारला आहे.