News Flash

Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच मोडले निर्बंध; मंदीर बंदीच्या आदेशानंतरही घेतलं देवदर्शन

मुख्यमंत्र्यांनीच १० ते २४ मे दरम्यान कठोर निर्बंध लागू असण्याची घोषणा केली ज्यात धार्मिक स्थळं बंद असतील असंही सांगितलेलं

प्रातिनिधिक फोटो

कर्नाटकमध्ये मागील काही आठवड्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यामध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आलीयत. मात्र असं असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. व्हाय. विजयेंद्रा यांनी नियमांचं उल्लंघन करत नांजुनागुड येथील श्रीकंटेश्वरा मंदिराला भेट दिल्याची माहिती समोर आलीय.

मंगळवारी विजयेंद्रा यांनी आपल्या पत्नीसहीत या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. कर्नाटकमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत धार्मिक स्थळं आणि मंदिरंही बंद ठेवण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच १० मे ते २४ मे दरम्यान राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती. “करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यभरामध्ये थैमान घातलं आहे. राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूनंतरही रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत,” असं येडियुरप्पा निर्बंध जाहीर करताना म्हणाले होते. “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये १० मे पहाटे सकाळी सहा वाजल्यापासून ते २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत,” असं या निर्बंधांच्या कालावधीसंदर्भात माहिती देताना येडियुरप्पा म्हणालेले. असं असतानाही मुख्यमंत्र्यांचा मुलगा पत्नीसहीत देवदर्शनाला गेल्याने सर्वसामान्यांसाठी एक नियम आणि राजकारण्यांसाठी वेगळा नियम आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय.

राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, पब्स, बार बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा येडियुरप्पांनी केली होती. मात्र त्याचसोबत अन्नधान्य, औषधं, दूध, भाजीपाला, फळं यासारखी दुकानं सकाळी सहा ते दहा कालावधीमध्ये सुरु ठेवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं. राज्याचे मुख्य सचिव रवी कुमार यांनी आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांना निर्बंध लागू नसतील असं स्पष्ट केलं होतं. तसेच आरोग्य यंत्रणेशीसबंधित सामुग्रीची ने-आण करण्यांनाही नवे निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. केंद्र आणि राज्याच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या आपत्कालीन सेवांमधील कर्मचाऱ्यांना सूट देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं.

राज्यामध्ये १० मे ते २४ मे दरम्यान कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, राजकीय, क्रीडा, संस्कृतिक, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं सरकारने घोषित केलेलं. राज्यातील करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या सल्लागार समितीने या दोन आठवड्यांच्या लॉकडाउनचा सल्ला दिलेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:49 pm

Web Title: karnataka cm son breaks covid 19 curbs to visit temple people call out vip treatment scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे पहिला मृत्यू
2 केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल मला माहिती नव्हती; नितीन गडकरींची जाहीर कबुली
3 Video : करोनाला पळवण्यासाठी भाजपा नेते यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर
Just Now!
X