कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन.आर.संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. एन.आर.संतोष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. एक ते दोन दिवसात संतोष यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असे सूत्रांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत नसल्यामुळे संतोष कधीकधी झोपेच्या गोळया सुद्धा घ्यायचा. संतोष यांची प्रकृती आता चांगली आहे. आज सकाळी त्यांनी ब्रेकफास्ट सुद्धा केला. एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वत: रुग्णालयात येऊन संतोषच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिसांनी पत्नी जान्हवीची जबानी नोंदवली. पत्रकारांशी बोलताना वैवाहिक जीवनात कुठलाही वाद नसल्याचे पत्नीने सांगितले. कुठलीतरी राजकीय घटना संतोषच्या मनाला लागली होती, असे तिने सांगितले.