News Flash

विलासरावांचे सरकार तारणारे शिवकुमार कर्नाटकचे सरकार वाचवणार का?

कर्नाटकच्या राजकारणात डीकेएस म्हणून ओळखले जाणारे शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी डी. के. शिवकुमार आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी पवईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. कर्नाटकच्या राजकारणात डीकेएस म्हणून ओळखले जाणारे शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते.

गौडा कुटुंबाला त्यांच्या बालेकिल्ल्यात कडवी टक्कर देत ५७ वर्षीय शिवकुमार यांनी कर्नाटकच्या राजकारणात आज ही उंची गाठली आहे. गौडा कुटुंब हे शिवकुमार यांचे राजकारणातील मुख्यप्रतिस्पर्धी पण शिवकुमार यांनी यावेळी राजकीय परिस्थिती ओळखून जुने वैर बाजूला ठेवून सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वोक्कालिगा असणारे शिवकुमार यांनी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा लपवून ठेवलेली नाही. त्यांनी सलग सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली असून पक्षासाठीही भरपूर काही केले आहे. त्यांच्या राजकारणाची जी पद्धत आहे त्यामुळे शत्रू सुद्धा त्यांना वचकून असतात.

यापूर्वी शिवकुमार यांनी २००२ साली काँग्रेसचे महाराष्ट्रातील सरकार वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात काँग्रेसचे आमदार फुटण्याची भिती होती. त्यामुळे विलासरावांनी आपल्या सर्व आमदारांना शेजारच्या कर्नाटकात हलवले. त्यावेळी एसएम कृष्णा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

कृष्णा यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तरुण शहर विकास मंत्री असलेल्या डी.के. शिवकुमार यांच्यावर सोपवली. शिवकुमार यांनी या सर्व आमदारांना बंगळुरुच्या बाहेर असलेल्या इगलटॉन रिसॉर्टवर आठवडाभर ठेवले. विश्वासदर्शक ठरावाच्यादिवशी ते या सर्व आमदारांना सुरक्षितपणे मुंबईत घेऊन आले. त्यानंतर विलासराव देशमुख सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि सरकार तरले. त्यानंतर शिवकुमार प्रसिद्धीच्या झोतात आले व गांधी कुटुंबाबरोबर त्यांचे अधिक दुढ संबंध झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 12:15 pm

Web Title: karnataka congress leader d k shivakumar congress jds govt save mumbai hotel dmp 82
Next Stories
1 भाजपा आमदाराचा हातात दारु आणि बंदुका घेऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 गोवा सरकार लग्नापूर्वी HIV चाचणी बंधनकारक करण्याच्या विचारात
3 मोदींविरोधात बोलल्यानेच माझ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा, संजीव भट्ट यांच्या पत्नीचा आरोप
Just Now!
X