विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत संरक्षण देण्याची मागणी

बंगळुरू : कर्नाटकमधील आघाडीचे सरकार उलथून टाकण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमचे आमदार श्रीमंत पाटील यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने कर्नाटक विधानसभेत केला.

आमदार पाटील हे रिसॉर्टवर आमच्यासमवेत होते, ते अचानक गायब झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, पाटील यांचे अपहरण करून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाटील हे रुग्णालयात असल्याची आणि त्यांच्या ईसीजी चाचण्या घेतल्या जात असल्याची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.

हा प्रश्न उपस्थित करताना शिवकुमार हात जोडून म्हणाले की, आपल्या पक्षाच्या आमदारांचे अपहरण करण्यात येत आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे, त्यांना आपण सुखरूप परत आणावे, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, असे शिवकुमार म्हणाले.

लोकप्रतिनिधी भीतीच्या वातावरणात आहेत, पाटील यांचे अपहरण करण्यात आले आहे आणि त्यांना एका खोलीत डांबण्यात आले आणि विशेष विमानाने नेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही शिवकुमार म्हणाले.

विधानसभेत पाटील उपस्थित राहू नयेत यासाठी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हे दर्शविणारा दस्तऐवज आम्ही सादर करू, आपल्याकडे पुराव्याबाबतचा दस्तऐवज आहे, त्यांना रुग्णालयात डांबून ठेवण्यात आले आहे, पाटील यांनी भाजपचे माजी आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासमवेत विमानातून प्रवास केला, असा आरोपही शिवकुमार यांनी चर्चेदरम्यान केला.

विश्वासदर्शक ठरावप्रक्रिया गुरुवारीच पूर्ण करा राज्यपालांचे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया दिवसाचे कामकाज संपण्यापूर्वी पूर्ण करावी, असे पत्र गुरुवारी राज्यपाल वजुभाई वाला यांनी विधानसभेचे अध्यक्ष के. रमेशकुमार यांना दिले.

विश्वासदर्शक ठराव गुरुवारीच मांडण्यात यावा, अशी विनंती भाजपच्या शिष्टमंडळाने वाला यांची भेट घेऊन केल्यानंतर वाला यांनी रमेशकुमार यांना प्रक्रिया गुरुवारीच पूर्ण करण्याबाबतचा संदेश पाठविला. विधानसभेत सरकारच्या बाजूने संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सत्तारूढ आघाडी चर्चा पुढे ढकलेल, अशी भीती भाजपला वाटत असल्याने त्यांनी गुरुवारीच ठराव मांडण्याचा आग्रह धरला, अशी चर्चा आहे.

कुमारस्वामी यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव सभागृहात चर्चेला आहे, त्यामुळे याबाबतची प्रक्रिया गुरुवारीच पूर्ण करावी, असे वाला यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. ही प्रक्रिया गुरुवारीच पूर्ण केल्यास लोकशाहीपरंपरेचा मान राखला जाईल, असे वाला यांनी संदेशात म्हटले आहे.