अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अनेक अर्थाने महत्वाच्या असणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाने आघाडी घेतली असली तर बहुमतापासून ते दूरच आहेत. काँग्रेस दुसऱ्या आणि जेडीएस तिसऱ्या स्थानी असले तरी या दोन्ही पक्षांनी आघाडीची घोषणा करत माध्यमांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतरच या पक्षांना वेळ देण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी निवडणुकीपूर्वी आपण किंगमेकर नव्हे तर किंगच ठरू अशी भविष्यवाणी केली होती. ती सत्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी मात्र काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली आहे. जनतेने नाकारल्यानंतरही काँग्रेससाठी सत्ता स्थापन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली. २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. यासाठी या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. या निवडणुकीत ज्या पक्षाला हार पत्करावी लागेल त्यांच्यासाठी हा मोठे नुकसान करणारा पराभव असणार आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांना बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव करायला लागण्याची शक्यता बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केली होती. कारण, भाजपा आणि काँग्रेसला येथे बहुमत मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस या पक्षाची मदत घ्यावी लागेल अशी भाकिते या चाचण्यांनी वर्तवली आहेत.

 

LIVE UPDATES:

– मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.

– येडियुरप्पा यांची काँग्रेसवर टीका

– मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी चार वाजता राज्यपालांची भेट घेणार. सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता

–  शिकारीपुरात मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येडियरप्पा ३५,३९७ मतांनी विजयी

– भाजपा अजूनही बहुमतापासून दूरच

– केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि निर्मला सीतारमन यांनी मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा केला

– मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

– भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा दुपारी तीन वाजता दिल्लीत वरिष्ठांची घेणार भेट

– दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

– आता देशात काँग्रेस खोजो अभियान सुरू होईल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांची भाजपाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया

– बेंगळुरू येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. पक्षाचा झेंडा हातात घेऊन घोषणा दिल्या जात आहेत.

–  भाजपाच्या यशाचा परिणाम, सेन्सेक्सने ३५० अंकाची उसळी घेतली



– आम्ही बहुमतासाठी आवश्यक ११२ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे जेडीएसबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच नाही: केंद्रीय मंत्री सदानंद गौडा

–  सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान वस्तुस्थिती स्पष्ट होईल. जेडीएसबरोबर आघाडीबाबत मी गुलामनबी आझाद आणि अशोक गेहलोत यांच्याबरोबर चर्चा करायला जात आहे: मल्लिकार्जून खरगे

– हुबळी धारवाड मतदारसंघातून भाजपाचे जगदीश शेट्टार यांची आघाडी

– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर आघाडीवर

– केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची घेतली भेट

– वरूणा मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र यांची आघाडी

– शिकारीपुरा मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा ३४२० मतांनी आघाडीवर

– बेल्लारी शहर मतदारसंघातून जी.सोमशेखर रेड्डी आघाडीवर

– धक्कादायक, चांमुडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या पिछाडीवर

– बदामी मतदारसंघातून भाजपाचे श्रीरामलू पिछाडीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची आघाडी

–  रामनगरमधून जेडीसएसचे कुमारस्वामी आघाडीवर

–  येडियुरप्पांनी सकाळी मतमोजणीपूर्वी देवदर्शन घेतले.

– भाजपा ४ तर काँग्रेस २ जागांवर आघाडीवर

– बेळगावमधील मतमोजणी अर्धा तास उशिराने सुरू होणार

– राज्यातील इव्हीएम मतमोजणीसाठी सुरू करण्यात आले आहेत.

– मध्य कर्नाटकात भाजपा आघाडीवर

– कोस्टल कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर

– मतमोजणीच्या पहिल्या कलानुसार काँग्रेस २२ जागांवर, भाजपा १३ तर जेडीएस ९ जागांवर आघाडीवर

– पोस्टल मतमोजणीस सुरूवात

– काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर विजयासाठी हवन करण्यात येत आहे.

– धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सकाळी देवदर्शन घेतले.

– मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

– इव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रूमची दृश्ये