भाजपाने आपला विजयी रथ कर्नाटकातही कायम ठेवल्याचे सुरूवातीच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, देवेगौडा यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुमताकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असल्याने आम्हाला जेडीएसशी आघाडी करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे किंगमेकर होण्याचे जेडीएसचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल असे सध्याच्या चित्रावरून तर दिसून येते.

मतदानोत्तर चाचणीत कर्नाटकात त्रिशंकू स्थिती होईल आणि जेडीएस किंगमेकर ठरेल असे दिसून आले होते. परंतु, सध्या तरी अशी परिस्थिती दिसत नाही. दरम्यान, काँग्रेस पिछाडीवर असले तरी त्यांनी सत्ता स्थापनेची आस सोडलेली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ता स्थापनेसाठी जेडीएसशी बोलणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. सकाळी साडेअकरापर्यंत वस्तुस्थिती समोर येईल. आम्ही जेडीएसबरोबर आघाडी करण्यास तयार असल्याचे संकेत त्यांनी दिली.

काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद आणि अशोक गेहलोत हे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारीच बेंगळुरूत दाखल झाले होते.