कर्नाटक निवडणूकांच्या निकालानंतरचा पेच वाढत असताना आता सोशल मीडियावरही त्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. काल निकालानंतर दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स आणि जोक्स फिरत आहेत. त्यानंतर आज एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या ट्विटर हॅंडलवरही खिल्ली उडविण्यात येत आहे. एक व्यक्ती अॅमेझॉनला आपल्याला थोडी मदत हवी आहे असे ट्विट करते. त्यावर कंपनीकडूनही अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला काय मदत हवी आहे असे विचारण्यात येते. त्यावर जेडीएसचे ७ आमदार मिळतील का असा प्रश्न समोरच्या व्यक्तीकडून करण्यात येतो.

यानंतर आणखी एक जण फ्लिपकार्टवर १० जेडीएस किंवा कॉँग्रेसचे आमदार मिळतील का असे विचारतो. त्यासाठी तुम्ही चांगले काय डील देऊ शकता असेही हा व्यक्ती विचारतो. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. आता या ट्विटला काय उत्तर देणार म्हणून कंपन्यांनी संबंधितांना अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या लोकांनी आपल्या ट्विटमध्ये कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलला मेन्शन केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही राजकीय गणिते कोणत्या दिशेने जाणार हा प्रश्न असताना त्यात या जोक्सची भर पडत आहे.

भाजपाने काँग्रेसचे काही लिंगायत आमदार आमच्या बाजूने असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराने आपल्याला भाजपाकडून पाठिंब्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याची ऑफर दिल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आता जेडीएसचे दोन आमदार अचानक गायब झाले आहेत. आमदार राजा व्यंकटप्पा नायक आणि वेंकट राव नाडगौडा अशी त्यांची नावे आहेत.