कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे. भाजपाकडे हा काळा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

बुधवारी कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले. आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.

‘मी निकालावर समाधानी नाही. कर्नाटकात मोदी लाट नसून भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा त्यांनी केला.

मला दोन्ही पक्षांनी ऑफर दिली होती. पण २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठीच मी काँग्रेससोबत जात आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.

कर्नाटकमध्ये भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ त्यांच्याकडे नाही. भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसने माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जनता दल सेक्यूलर पक्षानेही ही ऑफर स्वीकारली आणि सत्तास्थापनेचा दावा केला.