कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने आघाडी करत भाजपाला धक्का दिला आहे. पण ही आघाडी भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर कर्नाटकमध्ये भाजपाला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला निर्णायक बहुमत मिळालेले नाही. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ भाजपाकडे नाही. काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर हे दोन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र आले असून त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा देखील केला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने मंगळवारच्या निकालाच्या आधारे लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज घेतला आहे. कर्नाटकमधून लोकसभेच्या २८ जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर हे पक्ष एकत्र आले तर भाजपाला फक्त ६ जागांवरच विजय मिळेल, अशी आकडेवारी सांगते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला कर्नाटकमधून १७ जागांवर विजय मिळाला होता. २०१९ मध्ये ज्या सहा जागांवर भाजपाला विजय मिळू शकतो त्यामध्ये बागलकोट, हावेरी, धारवाड, उडुपी- चिकमंगळुरू, दक्षिण कन्नड आणि बेंगळुरु दक्षिणचा समावेश आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- जनता दल सेक्यूलर या पक्षाची आघाडी कायम राहिली तर त्यांना तब्बल २२ जागांवर विजय मिळू शकतो. २०१४ मध्ये हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. म्हणजेच विरोधी पक्ष एकत्र आले तर मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा मोठा फटका भाजपाला बसेल.

…तर काँग्रेस- जेडीएसलाच बहुमत असते
काँग्रेस- जनता दल सेक्यूलर या पक्षांनी निवडणुकोत्तर आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला. पण जर निवडणुकीपूर्वीच हे दोन पक्ष एकत्र आले असते तर त्यांना १५६ जागांवरच विजय मिळाला असता. तर दुसरीकडे भाजपाला फक्त ६८ जागांवरच समाधान मानावे लागले असते.