कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असून देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिल्याचे वृत्त आहे.

कर्नाटकमधील २२२ जागांसाठी मंगळवारी मतमोजणी झाली. या मतमोजणीत भाजपाने १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त ७३ जागांवरच समाधान मानावे लागले. देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी ११२ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत भाजपा सध्या पाच जागांनी पिछाडीवर आहे. पण भाजपा सर्वाधिक जागांवर विजय मिळवणारा पक्ष ठरला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने गोवा, मणिपूरचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. आता हे दोन पक्ष एकत्र आले तर मॅजिक फिगर (काँग्रेस ७३+ जे़डीएस ४०=११३) गाठू शकतात. गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता. पण भाजपाने सर्व ताकद पणाला लावली आणि त्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. याचाच बदला घेण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकमध्ये चक्क ‘छोट्या भावा’ची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. जनता दल सेक्यूलरच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे समजते. सोनिया गांधी यांनी दुरध्वनीवरुन देवेगौडा यांच्याशी चर्चा केल्याचे काही इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.