कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. बुधवारी भाजपा आमदारांनी येडियुरप्पा यांची पक्षाच्या विधीमंडळनेतेपदी निवड केली असून यानंतर येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. मी राज्यपालांना पत्र दिले असून ते योग्य तो निर्णय घेतील, अशी आशा येडियुरप्पा यांनी वर्तवली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला निर्णायक बहुमत मिळालेले नाही. भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागांवर विजय मिळाला आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. जनता दल सेक्यूलरचे कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे बुधवारी सकाळी कर्नाटकमधील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत येडियुरप्पा यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांना सत्तास्थापनेसंदर्भात पत्र दिले. पक्षाने विधीमंडळनेतेपदी माझी निवड केली आहे. मी राज्यपालांना पत्र दिले आहे. आता ते आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येडियुरप्पा यांचा शपथविधी उद्या (गुरुवारी) होण्याची शक्यता आहे.