कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरीच असून सत्तास्थापनेच्या दोऱ्या राज्यपाल वाजूभाई वाला यांच्या हातात आहे. मणिपूर, गोवा, मेघालय या तीन राज्यांच्या राज्यपालांनी सत्तास्थापनेत घेतलेल्या निर्णयाचा फटका भाजपाला आता कर्नाटकमध्ये बसू शकतो.
निवडणुकीत कमी जागांवर विजय मिळूनही निवडणुकोत्तर युती करून सत्तेवर दावा करण्याचा डाव भाजपाने यापूर्वी खेळला होता. गोवा, मेघालय आणि मणिपूरमध्ये भाजपाने हा डाव यशस्वी करुन दाखवला होता. आता भाजपाच्या याच खेळीचे अनुकरण काँग्रेसने केले आहे.

तीन राज्यात भाजपाने काय केले होते?
> गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसला १७ जागा आणि भाजपला १२ जागा असताना भाजपने मगोप आणि अन्य पक्षांशी युती करून सत्ता पटकावली.
> मणिपूरमध्ये २०१७च्या निवडणुकीत २८ जागा मिळविलेल्या काँग्रेसला डावलून २१ जागा मिळवलेल्या भाजपने सत्ता काबीज केली.
> मेघालयात मार्च २०१८ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला २१ तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या. असे असूनही इतर पक्षांशी युती केलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले.

कर्नाटकमधील परिस्थिती काय?
कर्नाटकमध्ये भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करत सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे.

विरोधकांचे म्हणणे काय? 

गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये यापूर्वी सरकारस्थापनेबाबत ज्या घटना घडल्या त्या अनुषंगाने कर्नाटकमध्ये भाजपाचा सत्तास्थापनेचा दावा मोडीत निघतो, असा दावा काँग्रेसने केला आहे.