कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप; आज विश्वासदर्शक ठराव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर यांनी केला आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. अर्थात निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व २२४ मतदारसंघांत व्हीव्हीपॅट म्हणजेच मतदान चिठ्ठीचा प्रयोग केला होता. त्यामुळे मतदाराला नेमके मत कोणाला दिले याची खातरजमा करणे शक्य होते. राजेश्वरीनगर मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दल काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर जयनगरमध्येही भाजप उमेदवाराच्या निधनाने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी २८ मे रोजी मतदान होणार आहे. दलित असल्याने उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

अध्यक्षपदासाठी भाजपकडूनही अर्ज

कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून रमेशकुमार यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेस व जनता दलाने ११७ सदस्यांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. अध्यक्षपद व विश्वासदर्शक ठरावाववर उद्याच शुक्रवारी मतदान होणार आहे.

कुमारस्वामी अहंकारी-येडियुरप्पा

कर्नाटकचे मुख्यमंत्री अहंकारी आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी केला आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांना बोलण्याची संधीही दिली नाही. हे चित्र पाहता जनता दल व काँग्रेस यांच्यात समन्वय नाही अशी टीकाही येडियुरप्पा यांनी केली. त्यामुळे अशा आघाडीकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.