फलक, भित्तिपत्रके, वाहनांवर ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार यापेक्षा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या वेळी समाजमाध्यम केंद्रित प्रचार सुरू असल्याचे दिसते. अगदी माहिती तंत्रज्ञानाची राजधानी असलेल्या बंगळूरुपासून दीडशे किमी असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये हेच चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या वेळी वाढलेले ६० लाख नवमतदार पाहता समाजमाध्यमांवर प्रचारात भर दिला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच समाजमाध्यमांवर प्रचार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटचा गावोगावी प्रचार झालेल्या कर्नाटकमध्ये या वेळी प्रचाराचे समाजमाध्यम हेच प्रमुख अस्त्र आहे. पूर्वी भाजपने समाजमाध्यमातून हवा तयार केली, मात्र आता आम्हीही तोडीस तोड उत्तर देत आहोत असे प्रदेश काँग्रसचे सरचिटणीस सुभाष अग्रवाल यांनी सांगितले. तर भाजपचे कर्नाटक समाजमाध्यमप्रमुख बालाजी श्रीनिवास यांनी  समाजमाध्यमांवर काँग्रेस अजून बाल्यावस्थेत असल्याचा टोला लगावत, ते आम्हाला काय टक्कर देणार असा सवाल केला आहे.

समाजमाध्यमांवरूनच  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमधील आरोपांना उत्तर देण्यासाठी ट्विटरचा मार्ग अवलंबला आहे. तर भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा हेदेखील समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यामुळेच ही निवडणूक समाजमाध्यमांवरून मोठय़ा प्रमाणात खेळली जात आहे. भाजप नुसते आरोप करत असून, राज्य सरकारच्या योजनांची माहिती आम्ही समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत नेत आहोत असे काँगेस नेते अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक पद्धतीने कसा करायचा हे पंतप्रधानांनी दाखवून दिले आहे, त्याच आधारे आम्ही प्रचारयंत्रणा राबवीत आहोत असून, आमचे उमेदवार प्रतिसाद देत आहेत असे भाजपच्या बालाजी यांनी स्पष्ट केले.

तंत्रस्नेही प्रचाराचे महत्त्व का?

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी बारा टक्के मतदार वाढले आहेत. गेल्या निवडणुकीत चार कोटी ३७ मतदार होते तर या वेळी ती संख्या चार कोटी ९७ लाख आहे. त्यामुळे हा नवमतदार डोळ्यापुढे भाजप व काँग्रेस समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेतेही काळाची गरज पाहून याचा वापर करत असल्याचे चित्र या वेळी आहे.

भाजपचा प्रचार नुसता हवेत असतो, आम्ही प्रत्यक्ष जमीनीवर काम करतो. भाजपकडे राज्यातील जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते कोणत्या तोंडाने आमच्यावर टीका करणार?

सुभाष अग्रवाल, प्रदेश, सरचिटणीस, काँग्रेस

समाजमाध्यमांवरील प्रचारात काँग्रेस आमच्या जवळपास देखील नाही. त्यामुळेच सैरभैर होऊन ते टीका करत आहेत. बी.एस.येडियुरप्पा राज्यात समाजमाध्यमांवर सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत.

बालाजी श्रीनिवास, समाजमाध्यम प्रमुख, कर्नाटक भाजप