कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी जाहिरनामा प्रकाशित केला. शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंतचे कर्जमाफ, द्रारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत स्मार्टफोन, महाविदयालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.

कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपाचा जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. जाहिरनाम्यात शेतकरी, महिला व तरुण यांच्यावर भर देण्यात आल्याचे येडीयुरप्पा यांनी सांगितले. याशिवाय गोवंश हत्या बंदी कायदाही राज्यात मंजूर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी काय?
कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी आगामी अर्थसंकल्पात कृषी खात्याचे स्वतंत्र अर्थसंकल्प असेल. तसेच शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येईल. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असेल. राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

महिलांसाठी काय?
भाजपाने कर्नाटकमध्ये महिलांसाठी स्त्री उन्नती फंड या योजनेअंतर्गत १० हजार कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय दारिद्य्र रेषेखालील महिलांना व मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स तसेच राज्यभरात स्त्री सुविधा योजनेअंतर्गत महिलांना एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जातील. यात १ हजार महिला पोलिसांची नियुक्ती केली जाईल. याशिवाय दारिद्य्र रेषेखालील मुलींच्या लग्नासाठी विवाह मंगल योजना सुरु केली जाणार आहे. याअंतर्गत त्यांना ३ ग्रॅम सोने आणि २५ हजार रुपयांची मदत केली जाईल. तसेच याच वर्गातील महिलांना मोफत स्मार्टफोनही दिले जाणार आहे.

तरुणांसाठी काय?
भाजपाने राज्यात मुख्यमंत्री लॅपटॉप योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप दिला जाईल.