कर्नाटकात भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. भाजपाच्या या विजयाचं विशेष महत्त्व आहे. कारण पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकातील या विजयासह भाजपासाठी ‘दक्षिण दरवाजा’ उघडला गेला आहे, त्यामुळे कर्नाटकानंतर आता दक्षिणेतील इतर राज्यांमध्येही पाय रोवण्याचा प्रय़त्न पक्षाकडून होईल. तामिळनाडू हे दक्षिणेतील सर्वात मोठं राज्य असून कर्नाटकानंतर आता भाजपा तामिळनाडूला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूमध्ये परिस्थिती आमच्यासाठी अनुकुल असल्याचं भाजपाने मध्यंतरी म्हटलं होतं. याचवर्षी त्रिपुरामध्ये विजय मिळवून भाजपाने इशान्य भारतात थाटात प्रवेश केला होता आणि आता दक्षिण भारतातही भाजपाने करिष्मा केला आहे. पण भाजपाला हा विजय सहज मिळालेला नाही, यामागे अनेक कारणं आहेत. निवडणूक प्रचारात पक्षाने संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान मोदी स्वतः ‘लढाई’साठी उतरले. पक्षाध्यक्ष अमित शहांपासून सर्वच मोठे नेते प्रचारामध्ये सक्रिय होते.

भाजपाच्या विजयाची 5 कारणं

बूथ मॅनेजमेंट आणि कार्यकर्ता –
भाजपाने या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं आणि त्याचवेळेस त्यांनी बूथ मॅनेजमेंटवर पूर्ण ताकद लावली. प्रत्येक बूथवर कार्यकर्ता आणि मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

लिंगायत मतदार –
कर्नाटकात लिंगायत समाजाचा मुद्दा मोठा होता. मावळते मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी मोठी खेळी करताना लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला. मात्र, भाजपाने त्याहून मोठी खेळी केली आणि याच समाजाच्या बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवलं. अमित शहा यांनी स्वतः लिंगायत समाजातील संतांची भेटही घेतली होती. याचा भाजपाला फायदा झाल्याचं मानलं जात आहे. लिंगायत समाजाची व्होटबँक भाजपाच्या पाठिशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून आले.

भ्रष्टाचार –
भाजपाने निवडणूक प्रचारात काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा केला. मोदींनी स्वतः या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका करताना नोटबंदीनंतर येथे तिजोऱ्या भरुन पैसे निघाले होते असं म्हटलं. अखेर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन मतदारांना विश्वासात घेण्यामध्ये भाजपा यशस्वी ठरली.

युवकांना लक्ष्य –
कर्नाटक निवडणुकीत तरुणांना आपल्याकडे खेचण्यात भाजपाला यश आलं. एकीकडे भाजपाने बेरोजगारीचा मुद्दा उचलला, तर तरुणांसोबत भेदभावाचा मुद्दाही त्यांनी उचलला आणि तरुणांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी ठरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा होते. मोदी कर्नाटकात १५ सभा घेणार होते, पण नंतर वाढवून त्यांनी २१ सभा घेतल्या. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या भागांमध्ये ते गेले. एकीकडे त्यांनी सत्तेतील काँग्रेसवर हल्लाबोल केला तर दुसरीकडे त्यांनी केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली, त्यामुळे मतदार त्यांच्याशी जोडले गेले.