केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे नरेंद्र मोदी-अमित शहा ही जोडगळी कर्नाटकात अल्पमताचे सरकार बहुमतामध्ये बदलेल असे अखेरपर्यंत अनेकांना वाटत होते. पण यावेळी काँग्रेसने गोवा, मणिपूर आणि मेघालयपासून धडा घेत चोख रणनिती आखल्यामुळे भाजपाचा सत्तेचा डाव फसला. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे हे राजकीय डावपेच यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली ते डी.के.शिवकुमार या नेत्याने.

कर्नाटकच्या राजकारणात डीकेएस म्हणून ओळखले जाणारे शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. गौडा कुटुंबाला त्यांच्या बालेकिल्ल्यात कडवी टक्कर देत ५७ वर्षीय शिवकुमार यांनी कर्नाटकच्या राजकारणात आज ही उंची गाठली आहे. गौडा कुटुंब हे शिवकुमार यांचे राजकारणातील मुख्यप्रतिस्पर्धी पण शिवकुमार यांनी यावेळी राजकीय परिस्थिती ओळखून जुने वैर बाजूला ठेवले व काँग्रेसची राजकीय व्यूहरचना यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फुटणार नाहीत याची शिवकुमार यांनी पुरेपूर काळजी घेतली. वोक्कालिगा असणारे शिवकुमार यांनी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा लपवून ठेवलेली नाही. त्यांनी सलग सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली असून पक्षासाठीही भरपूर काही केले आहे. त्यांच्या राजकारणाची जी पद्धत आहे त्यामुळे शत्रू सुद्धा त्यांना वचकून असतात.

यापूर्वी शिवकुमार यांनी २००२ साली काँग्रेसचे महाराष्ट्रातील सरकार वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात काँग्रेसचे आमदार फुटण्याची भिती होती. त्यामुळे विलासरावांनी आपल्या सर्व आमदारांना शेजारच्या कर्नाटकात हलवले. त्यावेळी एसएम कृष्णा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

कृष्णा यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तरुण शहर विकास मंत्री असलेल्या डी.के. शिवकुमार यांच्यावर सोपवली. शिवकुमार यांनी या सर्व आमदारांना बंगळुरुच्या बाहेर असलेल्या इगलटॉन रिसॉर्टवर आठवडाभर ठेवले. विश्वासदर्शक ठरावाच्यादिवशी ते या सर्व आमदारांना सुरक्षितपणे मुंबईत घेऊन आले. त्यानंतर विलासराव देशमुख सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि सरकार तरले. त्यानंतर शिवकुमार प्रसिद्धीच्या झोतात आले व गांधी कुटुंबाबरोबर त्यांचे अधिक दुढ संबंध झाले.