कर्नाटकातील चामराजनगरमधल्या सुलवाडी या गावातल्या मंदिरात प्रसाद खाल्ल्याने 11 जणांचा मृत्यू झाला तर 80 जणांना पोटदुखी, मळमळ आणि इतर त्रास सुरु झाला. मृतांमध्ये आता 15 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणाची दखल सरकारने घेतली असून मंत्री पुट्टरंगा शेट्टी यांनी ज्या रूग्णालयात रूग्णांना विषबाधेप्रकरणी दाखल करण्यात आले आहे तिथे भेट दिली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे अशीही माहिती समजते आहे. प्रसाद विषबाधा प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असेही शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
प्रसाद वाटण्याआधी दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच बहुदा कोणीतरी प्रसादात विष कालवले. या घटनेमुळे 11 निष्पापांचा बळी गेला अशीही माहिती समोर येते आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर ज्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांचा खर्चही सरकारतर्फे केला जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानंतर प्रसादवाटप झाले. प्रसाद खाल्ल्यानंतर अनेकांना उलटया, मळमळणे आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्रास सुरु झाल्यानंतर नागरिकांनी लगेच जवळच्या रुग्णालयात धाव घेतली.कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी या घटनेने आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. प्रसाद खाऊन आजारी पडलेल्या भाविकांच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे मी आदेश दिले आहेत असे ते म्हणाले. प्रसाद खातान रॉकेलचा वास आला पण त्याकडे दुर्लक्ष केले असे नागरिकांनी सांगितले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 1:59 pm