कर्नाटकात भाजपाच्या सत्तास्थापनेनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता असून भाजपाने सत्तास्थापन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून ते दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, ते दोन आमदार नेमके कुठे आहेत, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकात गुरुवारी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाकडे १०४ जागा असून त्यांना ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ झाली. मस्कीमधून निवडून आलेले आमदार प्रताप गौडा पाटील आणि बेल्लारीचे आमदार आनंद सिंह हे दोघे ‘गायब’ झाले आहेत. त्या दोघांशी पक्षातील नेत्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

काँग्रेसचे आमदार खादेर यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्व आमदार काँग्रेससोबतच आहेत. जे दोन आमदार गैरहजर आहेत ते देखील थोड्याच वेळात पक्षासोबत येतील, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government formation horse trading two congress mlas missing
First published on: 17-05-2018 at 10:30 IST