पुरोगामी कन्नड विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला. सीबीआय ने तपास हाती घेईपर्यंत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तपास करणार आहे. या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या बजरंग दलाच्या सहनिमंत्रकाला अटक करण्यात आली आहे.
७७ वर्षे वयाचे कलबुर्गी यांची दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी सकाळी त्यांच्या धारवाडमधील निवासस्थानी शिरून हत्या केली होती. ही हत्या निषेधार्ह असून अशी घटना घडायला नको होती. हे प्रकरण तपासाकरिता सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले. सीबीआयलाही तपासासाठी पत्र लिहिन्यात येणार आहे. मात्र सीबीआयची वाट पाहण्यापेक्षा सीआयडी तपास हाती घेईल, असे मंत्री टी. बी. जयचंद्र यांनी सांगितले.
पोलिसांना या प्रकरणी काही धागेदोरे मिळाले आहेत काय असे विचारले असता, तपास सुरू होत असून तो सर्व अंगांनी केला जाईल, असे गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले. हुबळी-धारवाड पोलिसांनी या खुनाचा तपासाकरिता विशेष तपास पथक नेमल्याचे जाहीर केले आहे.
कर्नाटकमधील लिंगायत समाजाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री व खासदार बी. एस. येडीयुराप्पा यांनी कलबुर्गी यांचे विचार कसेही असले तरी ते एक थोर इतिहासतज्ज्ञ होते. त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. हल्लेखोरांना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी केली.
धारवाडमध्ये सोमवारी सकाळी कलबुर्गी यांच्या शेकडो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर बजरंग दलाच्या सहनिमंत्रक भुवित शेट्टी याने या हत्येची जबाबदारी स्वीकारत आता पुढील लक्ष्य म्हैसूरमधील लेखक व टीकाकार के. एस. भागवत हे असल्याचे ट्वीट केले होते. मंगळूर पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेत शेट्टीला अटक केली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये डाव्या विचारसरणीच्या नेत्यांची हत्या झाली आहे. ऑगस्ट, २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि कोल्हापूरमधील टोल-प्रश्नावर रान उठविणारे भाकपचे नेते गोविंद पानसरे यांची फेब्रुवारीमध्ये अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या झाली होती. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे या दोन्ही महाराष्ट्रातील हत्या प्रकरणांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.