कर्नाटकमधील सत्तास्थापनेसंदर्भातील सर्वाधिकार आता राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे आहेत. योगायोग म्हणजे २२ वर्षांपूर्वी वजूभाई वाला गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी सत्तारूढ असलेल्या भाजपाविरोधात निर्णय देताना विधानसभा बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. आता, त्याच देवेगौडांच्या पक्षाला काँग्रेसच्या साथीनं बहुमताचा दावा करत कर्नाटकात सत्ता स्थापन करायचे वेध लागले आहेत. आणि या निर्णयाचे अधिकार भाजपाचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष व आताचे कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे आहेत. वाला हे जनता दलाला संधी नाकारत काव्यात्मक न्याय या उक्तीला जागत देवेगौडांविरोधातला हिशोब मिटवतात की बहुमताचा आदर करत त्यांना संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुजरातमध्ये सप्टेंबर १९९६ मध्ये कृष्णपाल सिंह हे राज्यपालपदी होते. तर भाजपाचे शंकरसिंह वाघेला, दिलीप पारिख यांनी बंड केलं होतं. या दोघांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपाचे सरकार पाडण्याचा डाव आखला. पण विधानसभेत सुरेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी विरोधी बाकांवरील आमदारांना दिवसभरासाठी निलंबित केले होते.

मात्र, त्यावेळी गुजरातचे राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली. यानंतर गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यावेळी राज्यपाल सिंह आणि तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या निर्णयावर गुजरात भाजपाने टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी वजूभाई वाला हे गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष होते.

आता २२ वर्षांनी केंद्रात सत्ताबदल झाला आहे. देशभरात भाजपा मजबूत स्थितीत आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या कर्नाटकमध्येच सत्तास्थापनेचा तिढा आहे. देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. तर राज्यपालपदी वजूभाई वाला आहेत. विशेष म्हणजे सलग तीन टर्म गुजरात भाजपा अध्यक्ष असलेल्या वालांनी नरेंद्र मोदींसाठी पद सोडलं होतं. आणि मोदींनी हे लक्षात ठेवत वालांना राज्यपालपदी नियुक्त केलं. त्यामुळे आता संघाच्या मुशीत वाढलेले राज्यपाल वाला हे देवेगौडांवर त्यावेळचा बदला घेणार का, यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.