11 December 2017

News Flash

शेट्टर सरकार संकटात?

कर्नाटकातील भाजप सरकारवर पुन्हा संकटाचे ढग दाटले असून भाजपच्या १३ विद्यमान आमदारांनी उघडपणे माजी

पीटीआय , हावेरी | Updated: December 10, 2012 1:18 AM

कर्नाटकातील भाजप सरकारवर पुन्हा संकटाचे ढग दाटले असून भाजपच्या १३ विद्यमान आमदारांनी उघडपणे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येडीयुरप्पा यांनी रविवारी जंगी मेळावा घेऊन वाजतगाजत कर्नाटक जनता पक्षाची औपचारिक स्थापना केली. दहाच दिवसांपूर्वी भाजपमधून बाहेर पडलेल्या येडीयुरप्पा यांनी घेतलेल्या या मेळाव्यात भाजपाचे तेरा विद्यमान आमदार व्यासपीठावर होते, या आमदारांना ‘येडीयुरप्पा यांच्याबरोबर जाल तर याद राखा’ असा दम दिलेला असतानाही ते येडीयुरप्पा यांच्या कळपात दाखल झाले आहेत.
येडीयुरप्पा यांनी शक्तिप्रदर्शनाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यावर तोफ डागली. नव्याने जनमताचा कौला घ्याच असे आव्हान त्यांनी शेट्टर यांना दिले.  जे आमदार येडीयुरप्पा याच्या मेळाव्यात होते, त्यात एच.हलप्पा, नेहरू ओळेकर, बी.पी.हरीश, सी.सी.पाटील व सुनील व्यालयापुरे यांचा समावेश होता. व्यालापुरे यांनी अलिकडेच पायाभूत विकास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते येडीयुरप्पा यांच्या पक्षात आले. त्यामुळे सरकारला फटका बसला आहे.
शेट्टर यांनी अजूनही आपणच वरचढ आहोत असे सांगून बहुमताचा दावा केला आहे. ज्यांनी पक्षादेश झुगारला त्यांच्यावर येडीयुरप्पा यांच्या मेळाव्याला हजेरी लावल्याबद्दल कारवाई केली जाईल, बेशिस्त खपवून घेणार नाही असे ते म्हणाले.
शेट्टर सरकारला दुसरा धक्का म्हणजे विधानपरिषद सदस्य शिवराज साज्जन यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस २१ विधानसभा सदस्य व सात विधानपरिषद सदस्य उपस्थित होते. चार खासदारींनीही येडीयुरप्पा यांची भेट घेतली आहे.     

रविवारच्या मेळाव्याला जाल तर कारवाई करू असा इशारा शेट्टर यांनी दिला होता पण आता तेरा आमदार आमच्याबरोबर आल्याने सरकारकडे बहुमतच उरलेले नाही
    – येडीयुरप्पा

First Published on December 10, 2012 1:18 am

Web Title: karnataka govt faces trouble 13 bjp mlas openly back bsy