विवाहाच्यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये समजूतदारपणाचा अभाव असेल, तर अगदी छोटेसे कारणही लग्न मोडण्यासाठी पुरेसे ठरते. अशाच एका क्षुल्लक कारणावरुन कर्नाटकच्या हसन तालुक्यातील एका गावात लग्न मोडले. नवरदेव लग्नाच्या आदल्यादिवशी आई-वडिलांच्या सांगण्यावरुन लग्नाच्या हॉलमधून गायब झाला. द न्यू इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

अगदी किरकोळ कारणावरुन हे लग्न मोडले. मुलीला लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी जी साडी विकत घेतली होती. ती मुलाच्या आई-वडिलांना पसंत नव्हती. साडीच्या दर्जावरुन मुलाचे आई-वडिल नाराज होते. याच कारणावरुन हे लग्न मोडले. लग्नाच्या आदल्यादिवशी मुलगा हॉलमधून निघून गेला. हे लव्ह मॅरेज होतं. वर्षभरापूर्वी दोघांची ओळख झाली आणि ते परस्परांच्या प्रेमात पडले.

मुलाने आणि मुलीने घरी सांगितल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी झाली व लग्न ठरले. मुलाच्या आई-वडिलांनी मुलीच्या पालकांना लग्नाच्या विधीच्या दिवशी मुलीला दुसरी साडी नेसवण्यास सांगितले. कारण त्यांना मुलीच्या आई-वडिलांनी विकत घेतलेली साडी पसंत नव्हती. त्यांनी साडीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गुरुवारी हे लग्न होणार होतं. पण नवरदेवच फरार झाल्याने हे लग्न मोडलं. मुलीच्या आई-वडिलांनी हसन तालुक्यातील महिला पोलीस ठाण्यात वरपक्षाविरोधात तक्रार नोंदवली आहे.