फटाकेबंदीचे समर्थन केले म्हणून कर्नाटकातील आयपीएस अधिकारी डी. रुपा यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दिवाळीत फटाके फोडणे ही हिंदू परंपरा नाही. महाकाव्य किंवा पुराणात कुठेही फटाक्यांचा उल्लेख केलेले नाही असे डी. रुपा यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते.

फटाके फोडण्याचा आरोग्यावर परिणाम होतो. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढते. त्याशिवाय बंगळुरुच्या हरित पट्टयावरही परिणाम होतो असे रुपा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. महाकाव्य आणि पुराणात फटाक्यांचा उल्लेख केलेला नाही. युरोपियन लोकांसोबत फटाके आपल्याकडे आले. हा हिंदू परंपरेचा भाग नाही असे रुपा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. रुपा यांच्या या पोस्टनंतर टि्वटरवर अनेकांनी इतर धर्माच्या परंपरांवरही तुम्ही असेच प्रश्नचिन्ह उपस्थित करता ? असा प्रश्न त्यांना विचारला.

भारताच्या प्राचीन शास्त्रामध्ये फटाक्यांचा उल्लेख केला आहे, असा ‘True Indology’ या टि्वटर हँडलवरुन दावा करण्यात आला होता. रुपा यांनी ‘True Indology’ चा दावा फेटाळला व जे तुम्ही सांगताय, त्याचा पुरावा द्या, असे सांगितले. काही तासांनी ‘True Indology’ हे टि्वटर हँडल सस्पेंड करण्यात आले. या वादानंतर ‘True Indology’ हे अकाऊंट सस्पेंड करण्याच्या निर्णयाचा अनेकांनी निषेध नोंदवला. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत सुद्धा आहे.