कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरून सोमवारी रात्रीपर्यंत गोंधळ सुरू राहिला. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांबाबत अध्यक्षांनी निर्णय देईपर्यंत या ठरावावर मतदान घेऊ नये, असा आग्रह काँग्रेसच्या सदस्यांनी धरला. तर विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेण्याची मागणी भाजपने केली. त्यावरून सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

आमदारांच्या एका गटाने बंड पुकारल्यानंतर काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे भवितव्य ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी गेल्या गुरुवारी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. या ठरावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी ठरवून दिलेल्या दोन मुदतींचे उल्लंघन करून सत्ताधारी आघाडीने ठरावावरील चर्चा शुक्रवापर्यंत लांबवली. ही प्रक्रिया सोमवारीच पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून मिळवल्यानंतर अध्यक्षांनी कामकाज सोमवापर्यंत स्थगित केले होते.

सत्ताधारी आघाडीने मतदानासाठी आणखी दोन दिवस मागितले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, ‘ठरावावरील मतदान लांबवल्यामुळे सभागृहाचा किंवा माझा सन्मान राहणार नाही’, अशा शब्दांत अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आपण सार्वजनिक जीवनात असून लोक आपल्याकडे पाहात आहेत, असे ते म्हणाले. ‘प्रत्येक जण आपल्यावर लक्ष ठेवून आहे. कृपया मला बळीचा बकरा बनवू नका. आपण सर्व जण मिळून आपले लक्ष्य साध्य करू या’, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी केले.ठरावाची प्रक्रिया सोमवारी संपायला हवी, यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांना पक्षादेश (व्हिप) जारी करण्याचा अधिकार आहे, असा निर्णय अध्यक्षांनी सोमवारी दिला. पक्षादेश जारी करणे हा तुमचा हक्क आहे, त्याचे पालन करणे अथवा न करणे आमदारांवर अवलंबून आहे. याबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास मी नियमांनुसार निर्णय देईल, असे रमेश कुमार यांनी या मुद्दय़ावर हरकतीचा मुद्दा मांडणारे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या यांना सांगितले.

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा घटनेवर आणि राज्याच्या लोकांवर विश्वास असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पद सोडावे, असे आवाहन भाजपने सोमवारी केले. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च विश्वासदर्शक ठराव मांडला, मात्र त्याची प्रक्रिया लांबवली जात असल्याची टीका पक्षाने केली.