|| मनोज सी.जी.

कर्नाटकमध्ये भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन काँग्रेस आमदारांना वळविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गोवा व इतर ठिकाणचा अनुभव पाहता काँग्रेसने उत्तम नियोजन केले. अगदी आमदारांना येणाऱ्या दूरध्वनींची नोंद करण्यास सांगितली. तसेच त्यांची हॉटेल्स बदलली. याच बरोबर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांना खास विमानाने चंदीगढ येथून आणण्यात आले. या नियोजनातूनच काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही उलट बहुमता अभावी येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागल्याने भाजपला धक्का बसला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निकालाच्या आदल्या दिवशी १४ मे रोजीच अहमद पटेल, गुलामनबी आझाद, अशोक गेहलोत व कर्नाटकची जबाबदारी पाहणारे के.सी.वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसला जर बहुमत मिळाले नाही तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यात घेण्यात आला. निकालाच्या दिवशी काँग्रेसचे चिटणीस मनिका टागोर, पी.सी.विश्वनाथ, मधू याक्षी गौड, सेक सलजीनाथ व यशोमती ठाकूर यांना ज्या विभागाची जबाबदारी तेथे जाण्यास सांगण्यात आले. आझाद, वेणुगोपाल व गेहलोत हे बंगळुरुमध्ये होते. भाजपला बहुमत मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर पक्षाच्या सर्व चिटणीसांना आमदारांशी संपर्क साधण्यास सांगण्यात येऊन तेथून बंगळुरुला येण्याचे निर्देश देण्यात आले. तेथून हे नाटय़ सुरु झाले. काँग्रेस व जनता दलाने १५ तारखेलाच सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेस पाचारण केले. त्यानंतर दिल्लीत ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी कायदेशीर लढाईचा निर्णय घेतला. मात्र यातील निष्णात असलेले अभिषेक मनु सिंघवी चंदीगढमध्ये होते. अहमद पटेल व रणदिप सुरजेवाला यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. कर्नाटकमधील काँग्रेस नेते एम.बी.पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून दूरध्वनीवरच याच्या मसुद्याची चर्चा करण्यात आली. सिंघवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्याच उत्तराखंडमधील प्रकरणात सहकार्य केलेले देवदत्त कामत यांचा समावेश होता. सिंघवी यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले मात्र चंदीगढ विमानतळ बंद होते. अखेर त्यांना विशेष विमान पाठविण्यात आले. सकाळी ६.३० वाजता ते दिल्लीत दाखल झाले. काँग्रेस नेत्यांसमवेत त्यांनी तातडीने चर्चा केली. याचिकेचा मसुदा तयार करण्यात आला.

दिल्ली व बंगळुरुत नाटय़

येडियुरप्पा यांनी सकाळी ९ वाजता शपथ घेतल्याने काँग्रेसने घाईने सुत्र हालविली. त्यामुळे भाजपने आम्हाला एकप्रकारे संधी दिली असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. कामत व इतर सहकारी सकाळी दहा नंतर न्यायालयात गेले. तर सिंघवी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते. दिल्लीत या घडामोडी सुरु असताना बंगळुरुतही वेगळचे नाटय़ सुरु होते. १६ ते १९ मे अशा चार दिवस या घडमोडी रंगल्या. अनेक काँग्रेस आमदारांना भाजप नेत्यांच्या मध्यस्तांकडून दूरध्वनी येत होते. पहिल्यांदा या आमदारांना इगल्टन हॉटेलमध्ये नेण्यात आले. दहा आमदारांचा एक गट अशी विभागणी करण्यात आली. एकेका ज्येष्ठ नेत्याला त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आमदारांनी अमिषे दाखविण्यात येत असल्याची तक्रार केली. काही जणांनी तर हॉटेल बाहेर आल्यास वाहन तयार त्यात पाच कोटी रुपये आहेत असे सांगितल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. त्यातच पोलीस सुरक्षा काढून घेतल्याने आम्ही कोचीकडे गेलो. मात्र पंचताकांकित हॉटेल मालकाने भाजपच्या दबावात बुकिंग रद्द केले. त्यानंतर आणखी एका हॉटेलचा पर्याय पडताळला. पण अखेर हैदराबादला वाहनाने जाण्याचा निर्णय झाल. तेलंगण पोलीसांनी सुरक्षेबाबत सहकार्य केले. व्यक्तीगत संबंधामुळे आमदार फुटले नाही. याचे एक उदाहरण म्हणजे आर. शंकर हे आमदार बाहेर गेले होते. मात्र जर माझ्या विषयी आदर असेल तर परत या या सिद्धरामैय्या यांच्या एका दूरध्वनीने ते परतले असे ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. भाजपनेही आमदार फोडण्यासाठी येनकेन प्रयत्न केले त्याला तितकेच चोख उत्तर आम्ही दिले व त्यांचा डाव नियोजनपुर्वक उधळला असे एका नेत्याने सांगितले.