27 February 2021

News Flash

कौलाबाबत मतमतांतरे..निवडणूक मात्र अटीतटीची!

कर्नाटकमध्ये कोणाला कौल मिळेल, हे अद्याप तरी कोणी ठामपणे सांगत नाही.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| हृषीकेश देशपांडे

कर्नाटकमध्ये कोणाला कौल मिळेल, हे अद्याप तरी कोणी ठामपणे सांगत नाही. प्रत्येकाचे विश्लेषण वेगळेवेगळे. कन्नड भाषा शिकण्यासाठी देशभरातून बी. व्ही. राघवन यांच्याकडे येणाऱ्यांशी चर्चा केली तर त्याचा प्रत्यय येतो आणि निवडणूक अटीतटीची असल्याचेही स्पष्ट होते.

सरकारी सेवेत असल्यापासून कन्नड शिकवण्याच्या आवडीपोटी राघवन हे जवळपास ३५ वर्षांपासून कन्नडचे मोफत वर्ग घेत आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कर्नाटकला येणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्यांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या वर्गात रविवारी कानोसा घेतला असता निवडणुकीत रंगतदार लढतीचे चित्र दिसले.

दक्षिण भारतीय नागरिक भाजपला स्वीकारणे अवघड असल्याचे मत ऑटोमोबाइल क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या भास्करन यांनी नोंदवले. त्यांना कारण विचारताच, हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नाचा मुद्दा अधोरेखित करतानाच जनतेने काय खावे हे ठरविण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला, असा रोकडा सवाल ते करतात. तीन दशके चेन्नईत घालविलेले भास्करन यांचे वास्तव्य गेली वीस वर्षे कर्नाटकमध्ये आहे. तामिळनाडूत तर पुढची १०० वर्षे सत्तेत येण्याची स्वप्ने भाजपने पाहू नयेत, असेही ते म्हणाले.

उत्तराखंडचा आनंद शर्मा हा योग प्रशिक्षक आहे. गेली पाच-सहा वर्षे बंगळुरुत आहे. वृत्तपत्रात राजकीय बातम्या वाचतो, असे ते सांगतो. मात्र सरकार कुणाचे येईल हे सांगता नाही, असे तो म्हणाला. भाजपबाबत सहानुभूती असल्याचे मात्र त्याने लपवून ठेवले नाही. तर मानव संसाधन विभागात काम करणाऱ्या ओदिशाच्या पवनने राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्ष बरा असा सूर लावला. निवडणूक मात्र अटीतटीची होईल, असे मत अनेकांनी नोंदवले.

पक्षांतर्गत गटबाजीचा फटका

सर्वच पक्षांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती आहे आणि त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो, असे भाकीत राघवन यांनी वर्तवले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये येतील तेव्हा हिंदी भाषा लादणार नाही, असे आश्वासन त्यांनी कन्नड जनतेला द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत कुणाचे सरकार चांगले होते, असे विचारता त्यांनी रामकृष्ण हेगडे यांच्या सरकारचा उल्लेख केला. हेगडे अल्पकाळ सत्तेत राहिले असले तरी काम चांगले केल्याचे प्रशस्तिपत्रक त्यांनी दिले.

देवेगौडांची खेळी महत्त्वाची

कर्नाटकच्या राजकारणे बारकावे माहीत असलेल्या राघवन यांनी त्रिशंकू स्थितीत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा देवेगौडा महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असे मत व्यक्त केले. काँग्रेस किंवा भाजप शंभरच्या आत राहिले आणि जनता दलाला ४० ते ४५ जागा मिळाल्या तर कदाचित देवेगौडा दुसरा मुलगा रेवण्णा याच्यासाठी उपमुख्यमंत्रिपदही मागू शकतात व या दोघांपैकी एकाबरोबर जाऊ शकतात, असे भाकीत त्यांनी वर्तवले. येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी मुख्यमंत्री असताना ते एक उत्तम प्रशासक होते, असा अनुभव राघवन यांनी सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:46 am

Web Title: karnataka legislative assembly election 2018 3
Next Stories
1 कर्नाटकमध्ये सप-बसप ‘मैत्री’ नाही
2 मी ‘किंगमेकर’ नाही, ‘किंग’च बनेन!
3 स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी आंतरवासियता योजना
Just Now!
X