लोकायुक्त कार्यालयातील खंडणी रॅकेट प्रकरणात मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून कर्नाटकचे वादग्रस्त लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला आहे.
राव यांनी आधी राजीनाम्याची मागणी होत असतानाही तसे करण्यास विरोध केला होता, पण सोमवारी त्यांनी राजीनामा दिला असून राज्यपाल वजुभाई वाला यांनी तो स्वीकारला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात निर्माण झालेली अस्थिरता दूर झाली आहे. राव हे जुलै महिन्यापासून रजेवर होते कारण त्यांचा मुलगा अश्विन राव याला विशेष चौकशी पथकाने खंडणी प्रकरणात अटक केली होती. भाजप व जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षांनी त्यांच्या हकालपट्टीचा ठराव कर्नाटक विधानसभेत मांडला व त्याला काँग्रेसनेही पाठिंबा दिला.
विधानसभा अध्यक्ष कागोडू थिमप्पा यांनी हा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठवला होता. लोकायुक्त कायद्यानुसार ठराव दाखल केल्यानंतर त्यावर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे मत घेणे आवश्यक आहे. जर लोकायुक्तांवरील आरोप शाबित झाले तर ठराव मंजूर करून तो राज्यपालांकडे पाठवण्यात येतो.