दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या मुलीमुळे राजकीय कारकिर्दीत उद्या अडथळा येऊ नये, म्हणून एका ३५ वर्षीय उदयोन्मुख राजकारण्याने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. बंगळुरुपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. क्रूर ह्दयाच्या पित्याने महिन्याभरापूर्वी हा गुन्हा केला होता. पण मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.

नेमकं काय आहे प्रकरण ?

चित्रदुर्ग जिल्ह्यातील जगलुर येथे राहणाऱ्या आरोपी निनगाप्पाने शशिकलासोबत दुसरे लग्न केले होते. निनगाप्पा आणि शशिकलामध्ये प्रेमसंबंध होते. पण दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे दहा वर्षांपूर्वी ते वेगळे झाले. शशिकला नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी बंगळुरुला आली. निनगाप्पा आपले टेलरींगचे दुकान चालवत होता तसंच राजकारणातही सक्रिय होता.

निनगाप्पाने दुसऱ्या एका महिलेसोबत विवाह केला. पण त्यानंतर तो आणि शशिकला पुन्हा संपर्कात आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. चारवर्षांपूर्वी त्यांनी गुपचूपपणे लग्न केले. या दरम्यान शशिकलाने एका मुलीला जन्म दिला. त्यांनी आपले नाते सगळयांपासून लपवून ठेवले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

निनगाप्पाला ग्राम पंचायतीची निवडणूक लढवायची होती. शशिकला खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. या दरम्यान कुटुंबीयांकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव वाढू लागला. त्यांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केले. नऊ सप्टेंबर रोजी शशिकलाने निनगाप्पाला आता कोणापासून काहीही न लपवता विवाह झाल्याचे कुटुंबीयांना सांगू, असे सांगितले.
निनगाप्पा तिचे ऐकायला तयार नव्हता, असे केल्यास त्याच्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीवर परिणाम होईल असे तो सांगत होता. त्याचदिवशी त्याने शशिकलाला तिच्या गावी जायला सांगितले. मुलीची मी काळजी घेईन, असा त्याने शब्द दिला. शशिकला त्याच्यावर विश्वास ठेऊन मुलीला त्याच्याकडे सोडून गावी गेली.

निनगाप्पा त्यादिवशी मुलीला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिची गळा आवळून हत्या केली. त्याने तिथेच दोन फूट खड्डा खणला व त्यात मुलीचा मृतदेह पुरला. त्यानंतर तो त्याच्या मूळघरी जाऊन पहिल्या पत्नीसोबत राहत होता.
या दरम्यान शशिकला फोन करुन निनगाप्पाला मुलीबद्दल विचारायची, तेव्हा तो मुलगी आपल्यासोबत असून आनंदात आहे असे उत्तर द्यायचा. आठ ऑक्टोबरला शशिकलाने फोनवरुन निनगाप्पा बरोबर भांडण केले. तिला मुलीसोबत बोलायचे होते. त्याने  मुलीला विसरुन जा, असे उत्तर दिले.

शशिकलाला संशय आला, तिने चित्रदुर्ग महिला पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तिने तक्रारीमध्ये पतीचेच नाव घेतले. पोलिसांनी निनागाप्पाची कसून चौकशी सुरु केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. उज्वल राजकीय भवितव्यासाठी मुलीची हत्या केल्याचे त्याने सांगितले.