बंगळुरूमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक युवतींसोबत काही टवाळखोरांनी असभ्य वर्तन केले. त्याबदद्ल कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना विचारले असता त्यांनी अशा घटना घडतच असतात असे उत्तर दिले आहे. बंगळुरूतील एमजी रोड आणि ब्रिगेड रोड परिसरात रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांनी मुलींची छेड काढली. त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. याबाबत विचारणा केली असता कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी अशा घटना होतच असतात असे म्हटले. नववर्षाची संध्याकाळ आणि नाताळ या दिवशी अशा घटना होतातच. आम्ही शक्य ती काळजी घेतो असे त्यांनी म्हटले.

या भागात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांची तपासणी करुन संबंधित तरुणांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. बंगळुरुमधील एम जी रोड आणि ब्रिगेड रोड हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा रस्ता गर्दीने बहरला होता. या भागात अनुचित घटना घडू नये म्हणून तब्बल १,५०० पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र मध्यरात्रीनंतर रस्त्यावरील गर्दी वाढली आणि टवाळखोरांनी याच संधीचा फायदा घेतला.

मद्यधूंद अवस्थेत असलेल्या तरुणांच्या घोळक्याने महिला आणि तरुणींना बघून अश्लील शेरेबाजी सुरु केली.तसेच काही ठिकाणी गर्दीत महिलांसोबत असभ्य वर्तनही करण्यात आले. टवाळखोर तरुणांचा हा प्रताप छायाचित्रकाराच्या कॅमे-यात कैद झाला आहे. बंगळुरु मिररने या संदर्भातील वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शी आणि छायाचित्रांचा पुरावा असतानाही बंगळुरु पोलिसांनी रात्रभरात एकही विनयभंगाची तक्रार दाखल झाली नाही असा दावा केला आहे. एमजी रोडवर दोन तरुणींसोबत असभ्य वर्तन झाल्याचे आम्ही पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तिथे जाऊन काही तरुणांचा पाठलागही केला. मात्र गर्दीचा फायदा घेत तरुण पळून गेले. काही वेळाने पोलिस गेल्यावर तेच तरुण पुन्हा तिथे हजर होते असे एका प्रत्यक्षदर्शीने मिररला सांगितले. या गर्दीतून महिलांना बाहेर काढताना त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींची दमछाक होत होती. बंगळुरुमधील या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. बंगळुरुमध्ये राहणा-या स्थानिक कलाकारांनीही या घटनेचा निषेध दर्शवला आहे. हजारो पोलिसांचा फौजफाटा असताना टवाळखोरांची महिलांची छेड काढण्याची हिंमत होते कशी असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल असे बंगळुरूचे डीजीपी ओम प्रकाश यांनी म्हटले आहे.