पायी चालत ३०० किलोमीटर अंतर कापणाऱ्या एका महिलेचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. शेजारच्या कर्नाटकातील बल्लारीमध्ये ही दुर्देवी घटना घडली. गंगम्मा असे या महिलेचे नाव असून ती बांधकाम मजूर होती. लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरामध्ये काम राहिले नसल्यामुळे ते पायी चालतच गावाकडे जात आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

२९ वर्षाची गंगम्मा रायचूर येथील आपल्या घरी जात असताना उपासमारीमुळे तिचा मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. हे दुर्देवी आणि दु:खद आहे. या प्रकरणात त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने राज्यांना स्थलांतरित मजुरांच्या अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करा आणि ते आहेत तिथेच थांबतील हे सुनिश्चित करा असे निर्देश दिले आहेत.

लॉकडाउनमुळे काम बंद झाल्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरु अशा मोठया शहरातून स्थलांतरित मजूर मोठया संख्येने गावाकडे जात आहेत. उपासमार आणि बल्लारीमध्ये निवासाच्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप गंगम्माच्या नवऱ्याने केला आहे. गंगम्माला किडनीचा त्रास होता तसेच हेपेटायटस-बी या आजारामुळे तिचा मृत्यू झाला असे व्हीआयएमएसमधील डॉक्टरांनी सांगितले. कॅम्पमध्ये आलेल्या सर्व मजुरांना अन्न आणि औषध पुरवण्यात आली होती अशी उपायुक्तांनी माहिती दिली.

गंगम्माचे कुटुंब वर्षभरापूर्वी रायचूर सोडून बंगळुरुला कामासाठी गेले होते. तिथे एका बांधकाम साईटवर ते मजुरीचे काम करायचे. २४ मार्चला लॉकडाउनची घोषणा झाली. त्यानंतर गंगम्मा अन्य मजुरांसोबत रायचूर येथे जाण्यासाठी निघाली. वाहन नसल्याने ते पायीच चालत निघाले. एक एप्रिलला बल्लारीच्या बॉर्डरवर पोहोचल्यानंतर तपासणी करुन निवारा छावणीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. गंगम्मा आजारी पडल्यानंतर तिला व्हीआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पाच एप्रिलला तिचा मृत्यू झाला.