देशात सध्या करोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना करोनाची लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच लसीकरण करून घेणं अपेक्षित आहे. त्यानुसार १ मार्चपासून अनेक ज्येष्ठ नागरिक देखील लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. पण असं असताना कर्नाटकच्या एका मंत्रीमहोदयांना मात्र थेट घरपोच करोनाची लस मिळाली आहे. हा प्रकार काही नेटिझन्स आणि राजकीय नेतेमंडळींनी देखील समोर आणल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने याची दखल घेतली असून कर्नाटक सरकारकडून यासंदर्भातला अहवाल मागवण्यात आला आहे.

 

सपत्नीक घेतली लस!

कर्नाटकचे कृषीमंत्री बीसी पाटील यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून काही फोटो ट्वीट केले. यामध्ये त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे त्यांच्या घरी करोनाची लस घेतानाचे फोटो होते. यासोबत त्यांनी नागरिकांना लसीकरणाला न घाबरण्याचा सल्ला देखील दिला होता. “आज माझ्या हिरेकरूर येथील घरी माझ्या पत्नीसोबत मी सरकारी डॉक्टरांकरवी करोनाची लस घेतली आहे. अनेक देशांकडून भारतात बनवण्यात आलेल्या लशीचं कौतुक होत असताना काही घटक लशीबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. माझं लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळून लस घ्या आणि करोनामुक्त भारतासाठी हातभार लावा”, असा संदेश देखील त्यांनी लिहिला होता. विशेष म्हणजे यात त्यांनी स्वत:च इतरांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता!

 

ट्वीटवर नेटिझन्सनी विचारला जाब!

मात्र, उत्साहाच्या भरात आपण चुकीच्या गोष्टीचे फोटो ट्वीट करत आहोत, याचं भानच मंत्रीमहोदयांना राहिलं नाही. त्यामुळे त्यांच्या या फोटोंवर कौतुकापेक्षा ‘तुम्ही घरी कशी लस घेतली?’ असा प्रश्न विचारणारेच ट्वीट जास्त आले. त्यासोबतच अनेकांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला टॅग करून याबाबत जाब विचारला.

 

 

अखेर आरोग्य मंत्रालयाने घेतली दखल

दरम्यान, या प्रकरणाची दखल केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली. “करोना लसीकरणाच्या प्रोटोकॉलमध्ये असं करण्याची परवानगी नाही. हे चुकीचं आहे. आम्ही यासंदर्भात कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे आधी प्रोटोकॉलच्या विरुद्ध जाऊन घरीच लस घेणे आणि त्यानंतर उत्साहाच्या भरात त्यावर ट्वीट करून ते जगजाहीर करणे, या दोन्ही बाबी कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांना आता भोवण्याची शक्यता आहे.