कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रेवन्ना रोज बंगळुरु ते  मतदारसंघ होलेनरसिपुरा असा जवळपास ३५० किमी प्रवास करतात. पण यामागे कोणतंही राजकीय किंवा सामाजिक कारण नसून एक अंधश्रद्धा आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण फक्त आणि फक्त नशीबाचा फेरा टाळण्यासाठी मंत्री महोदय रोज ३५० किमी प्रवास करतात. यामागील आणी एक मुख्य कारण म्हणजे त्यांना अद्याप बेंगळुरुत सरकारी बंगला मिळालेला नाही.

पण मग रेवन्ना दुसरं घर का घेत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण मिळालेल्या माहितीनुसार, रेवन्ना यांना एका ज्योतिषाने सांगितलंय की बेंगळुरूमध्ये तुम्ही स्वत:च्या मालकीच्या घरात रहायचं नाही, सरकारी बंगला चालेल… त्यामुळे ते बेंगळुरूत घर घेत नाहीत व सरकारी बंगला अद्याप मिळालेला नाही. परिणामी ते आपल्या मतदारसंघातल्या मूळच्या घरी रोज झोपायला जातात, त्यासाठी रोज ३५० किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात.

याबद्दल त्यांना विचारलं असता मला अद्याप सरकारी घर मिळालं नसल्याने प्रवास करत असल्याचं ते सांगतात. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिषाने रेवन्ना यांना मालकीच्या घरात रात्री झोपल्यास वाईट वेळ सुरु होईल असं सांगितलं आहे. रेवन्ना यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच त्यांना हा सल्ला देण्यात आला होता. विशेष म्हणजे रेवन्नादेखील हा सल्ला पाळत आहेत.

ज्योतिषाने रेवन्ना यांना सरकारी बंगल्यात जाऊन वास्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे. पण येथेही एक समस्या आहे. कुमार पार्क येथील जो बंगला रेवन्ना यांना हवा आहे, तिथे सध्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री महादेवप्पा वास्तव्यास आहेत. बंगला खाली करण्यासाठी अद्याप त्यांच्याकडे तीन महिन्यांचा अवधी आहे. महादेवप्पा २०१३ पासून येथे राहत असून, या बंगल्याने आपल्याला मंत्री म्हणून आपली छाप पाडण्यास मदत केल्याचं ते सांगतात.

यामुळे रेवन्ना यांच्याकडे सध्या दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते सध्या बेंगळुरु ते होलेनरसिपुरा दरम्यान प्रवास करत आहेत. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात आणि पूजा करतात. सकाळी ८ वाजता बेंगळुरुला निघण्याअगोदर ते मतदारसंघातील लोकांची भेट घेतात. सकाळी ११.३० वाजता बंगळुरुला पोहोचल्यानंतर रात्री ९ वाजता ते परतीच्या प्रवासाला निघतात. मध्यरात्री घरी पोहोचल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम पुन्हा सुरु होतो.