News Flash

Ramesh Jarkiholi : अश्लील व्हिडीओप्रकरणी आरोप झाल्यानंतर कर्नाटकच्या मंत्र्यांचा राजीनामा!

अश्लील व्हिडिओप्रकरणी आरोप झाल्यानंतर कर्नाटकचे जलसंवर्धन मंत्री रमेश जारकीहोली यांनी राजीनामा दिला आहे.

रमेश जारकीहोली

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. बऱ्याच वादानंतर त्यापैकी संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला असून त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना आता कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यावर देखील गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना त्यांनी तातडीने राजीनामा दिला असून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसेच, आपण नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा देत असल्याचं देखील म्हटलं आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एक अश्लील व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये अज्ञात महिलेसोबत रमेश जारकीहोलीच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा व्हिडीओ काही वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर देखील व्हायरल होऊ लागल्यानंतर जारकीहोली यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी दिनेश कालाहल्ली नामक व्यक्तीने बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. जारकीहोली या महिलेचं नोकरी देण्याच्या नावाखाली शोषण करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जारकीहोली यांच्या राजीनाम्याविषयी निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांसोबत बैठक देखील घेतल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर जारकीहोली यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यात काय म्हणाले जारकीहोली?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रमेश जारकीहोली यांनी कथित सेक्स टेप प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रात जारकीहोली म्हणतात, “माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.”

 

जारकीहोली यांचा कर्नाटक सरकारमध्ये चांगलाच दबदबा आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचं सरकार पाडण्यात जारकीहोली यांची भूमिका महत्त्वाची होती. यावेळी काँग्रेसचे १७ आमदार फुटल्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं आणि येडियुरप्पा पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.

Sex CD प्रकरणात अडकले जलसंवर्धन मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 2:35 pm

Web Title: karnataka minister ramesh jarkiholi video resign to b s yediyurappa pmw 88
Next Stories
1 दिल्ली : राष्ट्रपतींनी घेतला करोना लसीचा पहिला डोस
2 सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट
3 पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये ‘दादा’ची राजकीय इनिंग सुरू होणार? बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात…
Just Now!
X