करोना संकटाच्या काळात ५०७ एमबीबीएस डॉक्टरांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर कर्नाटक सरकारने वेतनवाढीची मागणी मान्य केली आहे. केवळ आश्वासन न देता तब्बल १५ हजार रुपये महिन्याला वाढवत असल्याचा आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात करोना रुग्णांवर आलेलं संकट टळलं आहे.

एकीकडे करोनाचं संकट आ वासून उभं असताना आणि रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना भाजपाशासीत कर्नाकटात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. पक्की नोकरी आणि वेतनवाढ अशा काही मागण्या करत तब्बल ५०७ डॉक्टरांनी बुधवारी सामूहिक राजीनामा दिला होते. करोनाच्या संकटात यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हे सर्व कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे एमबीबीएस डॉक्टर होते. ते सध्या कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरकारी आरोग्य केंद्रात काम करत होते. वेतनवाढ आणि पक्की नोकरी अशा त्यांच्या मागण्या होत्या. परंतु राज्यातील भाजपा सरकारकडून केवळ आश्वासनंच मिळत असल्याने कंटाळून बुधवारी या डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे यातील अनेक डॉक्टर्स करोना ड्युटीवर होते.

मागणी काय होती?
करोना संकटाच्या काळात गावात काम करणाऱ्या या डॉक्टरांना ४५ हजार रुपये मासिक वेतन मिळते. मात्र, या डॉक्टरांचा आरोप आहे की नियमित असणाऱ्या डॉक्टरांना ८० हजार वेतन मिळते. एवढंच नाही तर ज्या डॉक्टरांना करोनाच्या काळात काँट्रॅक्टवर घेतलं आहे त्यांनाही ६० हजार रुपये महिन्याला पगार दिला जातोय. त्यामुळे आता आमचं वेतन वाढवावं, अशी त्यांची मागणी होती.

इतकी झाली वेतनवाढ
आता कर्नाटकच्या आरोग्य खात्यानं काँट्रॅक्टवर असणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांच्या वेतनात १५ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंत्राटावर असणाऱ्या तेथील एमबीबीएस डॉक्टरांना आता ४५ हजारांऐवजी ६० हजार रूपये मासिक पगार मिळेल.