राजकीय हस्तक्षेप, अल्प वेतन आणि कामासाठी आवश्यक सुविधा नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत कर्नाटकमधील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सामुहिक रजा आंदोलन करण्याचे ठरवले आहे. अखिल कर्नाटक पोलीस महासभेने या आंदोलनाची हाक दिली असून, राज्यातील ६० हजार पोलीस कर्मचारी त्यात सहभागी होतील, असा दावा संघटनेने केला आहे. सामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी असणारे पोलीस स्वतःच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग निवडू लागल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या सरकारवर टीका होत आहे.
दरम्यान, कर्नाटकचे पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज आम्ही आधीच फेटाळले आहेत. त्यामुळे शनिवारी कोणतेही आंदोलन होणार नाही. आम्ही सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून तसे प्रतिज्ञापत्रच लिहून घेतले आहे.
कर्नाटक पोलीस महासभेचे अध्यक्ष शशिधर वेणूगोपाल यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.