कर्नाटकात सत्ताधारी आघाडीतील आमदारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेला राजकीय पेच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. भाजपाचे संख्याबळ वाढून आता १०७ तर काँग्रेस-जेडीएस आघाडीला १०१ आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार स्थापनेसाठी १०५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असले तरी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर.रमेशकुमार यांनी मी कोणाचाही राजीनामा स्वीकारलेला नाही असे सांगितले आहे.

मी आमदारांना १७ तारखेपर्यंतची वेळ दिली असून मी प्रक्रियेचे पालन निर्णय घेईन असे रमेश कुमार म्हणाले. काँग्रेसचे आणखी दोन आमदार के सुधाकर आणि एमटीबी नागराज यांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत. सुधाकर यांना काल रात्रीच कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

गणेश ह्युक्केरी आणि अंजली निंबाळकर हे दोन आमदार सुद्धा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि मंत्री शिवकुमार यांची धडपड सुरु आहे. ते आज बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी पवईतील रेनायसन्स हॉटेलमध्येही पोहोचले होते. पण पोलिसांनी त्यांना भेट घेण्यापासून रोखले व ताब्यात घेतले. कर्नाटकातील राजकीय नाटयाचा दुसरा अंक मुंबईत सुरु आहे.