07 March 2021

News Flash

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात गोळ्या घालून हत्या

गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.

गौरी लंकेश (संग्रहित छायाचित्र)

देशभरातील विचारवंतांनी केला निषेध

सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू असून त्या मालिकेत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची  मंगळवारी बंगळुरू येथे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीचा मृत्यू झाला. दरम्यान, गौरी यांच्यावर हल्ला करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत अद्याप कोणतीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही, परंतु ज्या पद्धतीने उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांची हत्या करण्यात आली. त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडले आहे.

गौरी लंकेश (५५) यांचे राजराजेश्वरी भागात घर असून तिथेच त्यांच्यावर रात्री ८ वाजताच्या सुमारास हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या वर्मी लागल्याने त्या जागीच कोसळल्या व त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या. हिंदुत्वावादाचा विरोध केल्याचा समज करीत यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास  राज्य सरकारांच्या गुन्हे शाखेने केले, परंतु त्या हत्याचा तपास काही पुढे सरकत नव्हते. त्यामुळे या  प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात आला. त्यानंतरही दिवसाढवळ्या विचारवंतांचा खून करण्याचा सुगावा लागला नाही. आधुनिक आणि प्रागतिक विचार मांडणाऱ्यांना विचारवंतांना लक्ष्य करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. त्याचा परिणाम गौरी लंकेश यांच्या हत्येत झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशातील डाव्या विचारसरणीचे साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंत याच्यांवर हल्ले वाढले आहेत. बंगळुरू येथील ज्येष्ठ संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी मारेकऱ्यांनी घरात घुसून गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. गौरी लंकेश या उजव्या विचारणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्राजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे खटले सीबीआयकडे चालवण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ज्येष्ठ सहकारी आणि बंगळुरूचे शान असलेल्या गौरी लंकेश यांना गमावल्याचे दु:ख असल्याचे म्हटले आहे.

 

डाव्या विचारवंतांची हत्या

हिंदु धर्मातील कर्मकांडाविरोधात परखड मत व्यक्त करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची सकाळी फिरायला निघाले असताना हत्या करण्यात आली होती. त्यानंतर डावे विचारवंत गोविंद पानसरे यांची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. साहित्यिक अकादमीचे पुरस्कार प्राप्त साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अशाप्रकारे उजव्या विचारसरणीला विरोध करणारे साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकारांची हत्येचे सत्र सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 10:17 pm

Web Title: karnataka senior journalist and activist gauri lankesh shot dead at bengaluru residence editor of lankesh patrike
टॅग : Gauri Lankesh
Next Stories
1 शरद यादव यांची खासदारकी रद्द करा, जदयूची उपराष्ट्रपतींकडे मागणी
2 राधे माँविरोधात गुन्हा दाखल करा, हायकोर्टाचे आदेश
3 लालूप्रसाद यांना ईडीचा झटका; मुलीच्या फार्म हाऊसवर जप्ती
Just Now!
X