कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी संघ परिवार आणि भाजपवर जहाल शब्दांत टीका केली. संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हे माणुसकी नसलेले हिंदू आहेत, असे त्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वी सिद्धरमय्या यांनी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने काँग्रेस पक्ष फुटीरतावाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिद्धरमय्या सरकार हिंदूविरोधी असल्याचे म्हटल्यानंतर हा वाद आणखीनच पेटला होता. गेल्या काही दिवसांत संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी हे विधान केले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर या सर्व मारेकऱ्यांना तुरूंगात धाडेल, अशी गर्जनाही शहा यांनी केली होती.

शहा यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सिद्धरमय्या यांनी म्हटले की, संघ परिवार आणि भाजपकडे स्वत:चे दहशतवादी असल्याचे विधान केले. यानंतर भाजप आणि संघाचे नेते सिद्धरमय्या यांच्यावर तुटून पडले होते. त्यामुळे सिद्धरमय्या यांनी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत आपल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले. मी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हिंदू दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मी देखील हिंदू आहे. मात्र, माझ्यात माणुसकी आहे. याउलट संघ आणि भाजपचे लोक माणुसकी नसलेले हिंदू आहेत, अशी टीका सिद्धरमय्या यांनी केली.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपने आता कर्नाटकवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपाने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, शहा यांची जादू कर्नाटकात चालणार नाही असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले होते.