करोनापुढे देशात हतबलता दिसून येत आहे. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. काही राज्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

करोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं

कर्नाटकमध्ये १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल असं कर्नाटकेचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक देशातील तिसरं करोना प्रभावित राज्य आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात २९,४३८ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर एका दिवसात २०८ जणांनी करोनामुळे जीव गमवला आहे.

“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

यापूर्वी दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे.