कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाने ब्राह्मण समाजातील मुलींसाठी दोन योजना सुरु केल्या आहेत. ‘अरुंधती’ आणि ‘मैत्रेयी’ असे या दोन योजनांचे नाव आहे. या दोन योजनांतर्गत ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

‘अरुंधती’ योजनेतंर्गत ब्राह्मण समाजातील वधूंना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ‘मैत्रेयी’ योजनेतंर्गत कर्नाटकातील पुजाऱ्यासोबत विवाह करणाऱ्या ब्राह्मण मुलीला तीन लाख रुपयांचा बाँड मिळेल. ‘अरुंधती’ योजनेतंर्गत लग्नाच्या वयाच्या झालेल्या ५०० ब्राह्मण मुली आणि ज्या आर्थिक दुर्बल घटकात मोडतात त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ‘मैत्रेयी’ योजनेसाठी २५ मुलींची निवड करण्यात आली आहे.

या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. “मुलगी आणि मुलाचा हा पहिला विवाह असला पाहिजे. वधुच्या कुटुंबाला ती आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल” असे मंडळाचे अध्यक्ष एच.एस.सचिदानंद मुर्ती यांनी सांगितले.