News Flash

“मोदी काय म्हणतायत बघू आणि ठरवू”; करोनासंदर्भातील प्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उत्तर

"पंतप्रधान मोदी काय म्हणतात त्यासाठी वाट बघूयात त्यानंतर..."

फाइल फोटो (सौजन्य: पीटीआयवरुन साभार)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्य सरकार करोनासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल याबद्दल पुढील पाऊल काय असावं यासंदर्भात मोदींकडून मार्गदर्शन केलं जाण्याची आपण वाट पाहत असल्याचं येडियुरप्पांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यामध्ये कठोर निर्बंध लावल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाहीय. त्यामुळे राज्यातील नियम आणखीन कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत का?, असा प्रश्न बुधवारी येडियुरप्पांना विचारण्यात आला. “पंतप्रधान मोदी काय म्हणतात त्यासाठी वाट बघूयात त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांच्या आधारे आम्ही योग्य तो निर्णय घेऊ,” असं येडियुरप्पा या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. माजी मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा- करोना केंद्रात मुस्लीम कर्मचाऱ्यांची नियुक्तीवरुन भाजपा नेत्यांनी घातला गोंधळ; तेजस्वी सूर्यांविरोधात व्यक्त होतोय संताप

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील असा अंदाज येडियुरप्पांनी व्यक्त केला आहे. तसेच अशा कालावधीमध्ये केंद्र सरकार राज्यांना निर्देश देणं सामान्य गोष्ट असल्याचंही येडियुरप्पांनी म्हटलं आहे. “केंद्र सरकारने राज्यांना निर्देश देणे अशा परिस्थितीमध्ये सामान्य बाब आहे. आम्ही त्या निर्देशांचे पालन करु,” असं येडियुरप्पा म्हणाले.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक मंत्री नियुक्त केला असून तुम्ही थेट त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन आहात का असा प्रश्नही येडियुरप्पांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना येडियुरप्पांनी, “मंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले असून रोज त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात येत आहे. प्रत्येक मंत्री त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पोहचले आहेत,” असं सांगितलं.

मागील एका आठवड्यापासून कर्नाटकमध्ये जनता कर्फ्युचं आवाहन करण्यात आलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करा असं आवाहन यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. कर्नाटकमध्ये बुधवारी करोनाचे ५० हजार रुग्ण आढळून आले असून अर्ध्याहून अधिक रुग्ण हे बंगळुरुमध्ये आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 9:22 am

Web Title: karnataka waiting for modis direction yediyurappa scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल
2 करोना केंद्रात मुस्लीम कर्मचाऱ्यांची नियुक्तीवरुन भाजपा नेत्यांनी घातला गोंधळ; तेजस्वी सूर्यांविरोधात व्यक्त होतोय संताप
3 “करोना परिस्थिती कशी हाताळू नये हे मोदी सरकारने जगाला दाखवून दिलं”
Just Now!
X