कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही फक्त या राज्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी ती खूप महत्वाची आहे. या निवडणुकीतूनच भाजपाला दक्षिणेत प्रवेश करण्यासाठी दरवाजे खुले होतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत व्यक्त केला. मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण केल्यास यश मिळते, हा मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा मनसुबा यावेळी यशस्वी होणार नाही. भाजपा हा इतरांपेक्षा वेगळ्या संस्कृतीचा पक्ष आहे. इतर पक्ष हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करतात. भाजपाकडे जगातील सुप्रसिद्ध नेते आहेत. त्याचबरोबर ११ कोटींहून अधिक सभासद असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

कर्नाटक हे भाजपासाठी खूप महत्वाचे राज्य आहे. आम्हाला दक्षिणेत जाण्यासाठी इथूनच मार्ग खुले होणार आहेत, असे म्हणत शहा यांनी काँग्रेस व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आमदारपूत्राचा उल्लेख केला. काँग्रेसचे आमदार हरीस यांच्या पुत्राने एकाला मारहाण केली, पण अजूनही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल नाही, असे का, असा सवाल उपस्थित करत तो हरिस यांचा मुलगा आहे. त्याच्या माध्यमातून मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजपाची संस्कृती इतर पक्षांपेक्षा भिन्न आहे. इतर पक्ष आणि त्यांचे मंत्री हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करतात. दुसऱ्या बाजूला आमच्याकडे जगप्रसिद्ध नेते आणि काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेले आमचे ११ कोटी सदस्य असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

दरम्यान, कर्नाटकातील भ्रष्ट सरकार हटवा, असा संदेश मोदी यांनी गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये झालेल्या सभेत दिला. त्यावर, गैरव्यवहारांच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खाऊन आलेले येडियुरप्पा भाजपाला कसे चालतात, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. भाजपाची सारी मदार लिंगायत समाजावर असतानाच काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म किंवा पंथाचे आश्वासन देत चुचकारले आहे. भाजपाचा मात्र स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास विरोध आहे. लिंगायत समाजाला पुढे करीत काँग्रेस जातीपातींचे राजकारण करीत असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे असून, पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील, असा भाजपाला विश्वास आहे.