गायींच्या नावाखाली शैतान आता गोंधळ घालू शकतो. दोन महिन्यांनी बकरी ईद आहे. त्या दिवशी गायींची कत्तल करण्यावरुनही गोंधळ घातला जाईल. पण मी आधीच सांगतोय, असं नको व्हायला की त्या दिवशी गायींसोबत आणखी कोणाची ‘कुर्बानी’ द्यावी लागेल, असे वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान मौलाना तन्वीर हाश्मी यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर कर्नाटकमधील विजयपूरा येथील हाशीम पीर दर्ग्याचे प्रमुख मौलाना तन्वीर हाश्मी यांनी दोन दिवसांपूर्वी समाजाला संबोधित केले. या कार्यक्रमाला कर्नाटकचे आरोग्य मंत्री व काँग्रेस आमदार शिवानंद पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील तन्वीर हाश्मी यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाली असून यात ते चिथावणीखोर विधान करताना दिसत आहे. तन्वीर हाश्मी म्हणाले, मी एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो. दोन महिन्यांनी ईद आहे. गायींच्या नावाखाली आता शैतान गोंधळ घालेल. आत्ताच सांगून ठेवतोय, असं नको व्हायला की गायीसोबत आणखी एकाची कुर्बानी द्यावी लागेल, असे विधान त्यांनी केले. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या समोरच मौलानांनी प्रक्षोभक विधान केले असले तरी यावर शिवानंद पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी नगरसेवकांना फक्त हिंदूंसाठी काम करा, ज्यांनी आपल्याला मत दिलं आहे, मुस्लिमांसाठी नाही अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर मौलानांचे हे विधान समोर आले आहे.

दरम्यान, हाश्मी यांच्या प्रक्षोभक विधानाच्या क्लिपवरुन कर्नाटक सरकारने मौन धारण केल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या रितू राठोड यांनी केली आहे. मौलाना गोवंश हत्येसाठी लोकांना पाठिंबा देत आहेत. ही लाजीरवाणी गोष्ट असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka will sacrifice cow on bakrid says muslim cleric tanveer hashmi in vijayapura
First published on: 19-06-2018 at 03:36 IST