करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात आजही शाळा, कॉलेज बंद आहेत. यावर उपाय म्हणून अनेक राज्यांत ऑनलाईन शिकवण्यांना सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दूरदर्शन या सरकारी वाहिनीवरुन शिकवणीचे वर्ग सुरु केले आहेत. मात्र आजही देशात अनेकांना या ऑनलाइन शिकवणीसाठी मोबाईल किंवा टीव्ही खरेदी करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकातील एका महिलेवर आपल्या मुलांच्या शिकवणीसाठी टीव्ही आणायला आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजेच मंगळसूत्र गहाण ठेवायची वेळ आली आहे.

कर्नाटकाच्या गडग जिल्ह्यातील नारगुंड तालुक्यात राडर नागनूर गावात राहणाऱ्या कस्तुरी चालवाडी यांना ४ मुलं आहेत. आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी घरात टिव्ही आणण्याकरता कस्तुरी यांना आपलं मंगळसूत्र गहाण ठेवायला लागलं. गावातील तहसीलदारांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी चौकशी करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना या महिलेकडे पाठवलं. कस्तुरी यांनी ज्या सावकाराकडे आपलं मंगळसूत्र गहाण टाकलं होतं, परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यानेही कस्तुरी यांचं मंगळसूत्र त्यांना परत केलं आहे. इतकच नव्हे तर सावकाराने कस्तुरी यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा पैसे परत देण्याची सूट दिली आहे. India Today ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कस्तुरी यांच्या परिस्तितीबद्दल माहिती मिळताच, आजुबाजूच्या काही लोकांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. काँग्रेस आमदार झमीर अहमद आणि कर्नाटकचे मंत्री बी.सी.पाटील यांनीही कस्तुरी यांना अनुक्रमे ५० हजार आणि २० हजारांची मदत करुन सावकाराचे पैसे परत करण्यासाठी मदत केली आहे. “दूरदर्शनवर मुलांच्या अभ्यासाचे व्हिडीओ दाखवत असतात. पण आमच्या घरात टीव्ही नसल्यामुळे मुलं शेजारी जाऊन टिव्ही बघायची. ज्यावेळी त्यांच्या शिक्षकांनी अभ्यासाकरता घरात टीव्ही असणं गरजेचं आहे असं सांगितल्यानंतर मला याची जाणीव झाली. टीव्ही खरेदी करण्यासाठी मी कर्ज काढण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीही कर्ज दिलं नाही. अखेरीस माझं मंगळसूत्र गहाण ठेवण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.”

कस्तुरी यांचा पती मुथप्पा हा रोजंदारीवर काम करतो. करोनामुळे लॉकडाउन काळात त्यांचा रोजगार तुटला. कस्तुरी यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं असून त्यांची ३ मुलं ही सातवीत शिकत आहेत.