कर्नाटकचे राजकीय नाट्य आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारविरोधात गुरूवार १८ जुलै रोजी विधानसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यानंतर विधानसभेत मतदान होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्याचा गुरूवारी समारोप होणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना या दिवशी बहुमत सिद्ध करण्यासाठी शक्तीप्रदर्शन कराव लागणार आहे. या अगोदर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, ज्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसला आशा आहे की, बंडखोर आमदार त्यांना साथ देतील व सरकार वाचवण्यास मदत करतील. तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी देखील म्हटले आहे की, चर्चेनंतर विश्वासदर्शक ठरावावर १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. या अगोदर भाजपाने कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे विश्वासदर्शक ठरावासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी केली होती.

तर कर्नाटक भाजपा अध्यक्ष येदियुरप्पा यांनी म्हटले आहे की, त्यांना बहुमत प्राप्त करण्याची पुर्णपणे खात्री आहे. मुंबईत असलेले १५ आमदार व दोन अपक्ष आमदार भाजपाला पाठींबा देणार आहेत. शिवाय भाजपाला आणखी दोन आमदारांचा पाठींबा मिळाला आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शक्तीप्रदर्शनादरम्यान पराभव होणार आहे. भाजपाचे १०५ आमदार एकत्र आहेत.