आमदारांच्या राजीनाम्याबाबत तातडीने निर्णय नाहीच; विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

बंगळूरु : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आमदारांच्या राजीनाम्याबाबत तातडीने निर्णय घेता येणार नसल्याचे विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. राजीनामा पत्रांची पडताळणी करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांच्या राजीनाम्याबाबत दिवसभरात (गुरुवारीच) निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. तसेच काय निर्णय घेतला, हे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत कळविण्यासही न्यायालयाने सांगितले. त्यावर या आदेशात सुधारणा करण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. मात्र, आदेशात बदल करण्यास न्यायालयाने नकार दिला.

दुसरीकडे, बंडखोर आमदार गुरुवारी खास विमानाने मुंबईहून बंगळूरुमध्ये दाखल झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार दहा बंडखोर आमदारांनी रमेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नव्याने राजीनामा पत्रे सादर केली.  हे आमदार आणि रमेशकुमार यांच्यात तासभर चर्चा झाली. राजीनामा पत्रे हेतूपूर्वक स्वीकारली जात नसल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले.

‘‘आमदारांनी आता सादर केलेली राजीनामा पत्रे विहित नमुन्यात आहेत. मात्र, त्यांनी स्वेच्छेने राजीनामे दिले आहेत का, हे पाहावे लागेल. या प्रकरणात विद्युतवेगाने निर्णय घेता येणार नाही. राज्य आणि घटनेशी बांधील राहात राजीनामा पत्रांची पडताळणी करून निर्णय घेऊ’’, असे रमेशकुमार यांनी या आमदारांना सांगितले.

शक्तिपरीक्षेस सत्ताधारी तयार

कर्नाटकच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. सरकार वाचवणारच, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी राजीनाम्याची भाजपची मागणी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी फेटाळून लावली. हे सरकार पाडण्याचा भाजपचा हा सातवा प्रयत्न आहे. केंद्रातील सरकारच्या बळावर भाजपकडून लोकशाहीवर हल्ला सुरू असल्याची टीका ग्रामविकासमंत्री कृष्णा बेरे गौडा यांनी केली.

बंडखोर आमदार पुन्हा मुंबईत

कर्नाटकचे बंडखोर आमदार गुरुवारी दुपारी मुंबईहून विशेष विमानाने बंगळूरुमध्ये दाखल झाले. तेथून खास बसने ते विधानभवनात पोहोचले. विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर १४ बंडखोर आमदार रात्री पुन्हा मुंबईत दाखल झाले.